कोल्हापूर : चंद्रकांतदादांमुळेच थेट पाईपलाईन रखडली | पुढारी

कोल्हापूर : चंद्रकांतदादांमुळेच थेट पाईपलाईन रखडली

कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असताना थेट पाईपलाईनच्या कामातील विविध खात्यांच्या परवानग्या भाजपने रोखल्याने 887 दिवस पाईपलाईनचे काम रखडले होते. पालकमंत्री असताना पाच वर्षांत काळम्मावाडी धरणाला भेट द्यायलाही वेळ मिळाला नसलेल्या चंद्रकांत पाटील यांना थेट पाईपलाईनवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

गिरणी कामगाराचा मुलगा म्हणता, मग एकदाही शाहू मिलला का भेट दिली नाही? दादा सत्तेवर असताना राष्ट्रीय पातळीवरील आयआयएम, ट्रिपल आयटी, एम्ससारख्या चांगल्या संस्था नागपूरला गेल्या, त्यातील एखादी कोल्हापुरात व्हावी यासाठी त्यांनी का प्रयत्न केले नाहीत? कोल्हापूरकरांना शब्द दिल्याप्रमाणे थेट पाईपलाईनचे काम आपण 100 टक्के पूर्ण करणारच, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कसबा बावडा येथे प्रचंड गर्दीच्या साक्षीने झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम विभागात 9 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप खा. विनायक राऊत यांनी यावेळी केला. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला मी आज उत्तर देणार नाही. मी संयम पाळणारा माणूस आहे. टीकेपेक्षा विकासावर माझा भर आहे. मी लोकशाही मानणारा आहे. विरोधकांना योग्य वेळी उत्तर देईन, असा इशारा पालकमंत्री पाटील यांनी दिला. माजी खासदारांनी महिलांबद्दल अपमानकारक वक्तव्य केले.

आता ही निवडणूक महिलांनी आपल्या हातात घेतली आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद, महिलांचा सहभाग आणि तरुणांची साथ या जोरावर ही निवडणूक जयश्री ताई प्रचंड बहुमताने जिंकतील, असा विश्वास ना. सतेज पाटील यांनी व्यक्त केला. जयश्री जाधव म्हणाल्या, आण्णा गेल्यानंतर ना. सतेज पाटील हे भावासारखे पाठीशी उभे राहिले. त्यांचे पाठबळ, महाविकास आघाडीची ताकद आणि आपल्या सर्वांच्या साथीने आण्णांचे स्वप्न पूर्ण करण्यात निश्चित यशस्वी होईन.

दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा टाकू देऊ नका

कसबा बावडा नेहमीच प्रत्येक सुख- दुःखाच्या काळात आमच्या सोबत राहिला आहे. बावड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या कुटुंबातील तिसरी पिढी कार्यरत आहे. गावचा सुपुत्र म्हणून आपल्याला अभिमान वाटेल असे काम करत राहीन. बावड्यातील माता-भगिनींनी विरोधकांचा प्रचार करणार्‍या गावातील मोजक्या लोकांना तुमच्यासाठी विरोधकांनी काय केले? हा प्रश्न नक्की विचारावा. कसबा बावडा या आपल्या घरात दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा टाकू देऊ नका, असे आवाहन पाटील यांनी केले.

कसबा बावड्यात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार

येत्या दोन वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा कसबा बावडा येथे उभारणार आहे. त्याची जबाबदारी आ. ऋतुराज पाटील यांच्याकडे दिली असून, त्यासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, असा विश्वास ना. पाटील यांनी दिला.
बावडेकरांचं दांडकं घट्ट आहे

महिलांचा अवमान, खालच्या पातळीवरची शिवराळ भाषा बोलणार्‍यांचे संस्कार दोन नंबरचे आहेत. मटका, नाफ्तावाल्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार? 12 एप्रिलला बावडेकरांचं दांडकं घट्ट आहे हे कदमांना दाखवून द्या, असे आवाहन ना. पाटील यांनी केले.

1 नंबरच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित

उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी प्रचंड कष्ट केले आहेत. त्यामुळे 1 नंबरच्या उमेदवार असलेल्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित असल्याचे ना. पाटील यांनी
सांगितले.

Back to top button