बुशरा बिबीने कोंबडे जिवंत जाळले, पण इम्रान खान यांची खुर्ची खाक झालीच! | पुढारी

बुशरा बिबीने कोंबडे जिवंत जाळले, पण इम्रान खान यांची खुर्ची खाक झालीच!

इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची जाऊ नये म्हणून त्यांची पत्नी बुशरा बिबी ऊर्फ पिंकी पीरनी यांनी घराच्या आवारात टनोगणती जिवंत कोंबडे जाळल्याचे आरोप झाले. आपल्या घराण्यात जर इम्रान खान यांनी लग्न केले तर ते पंतप्रधान होतील, असा साक्षात्कार बुशरा बिबींना झाल्याचेही सांगण्यात येते. यातूनच बुशरा बिबींनी आधी स्वतःच्या बहिणीचे, नंतर स्वत:च्या मुलीचे लग्न इम्रान खान यांच्याशी लावून देण्याचा प्रस्ताव दिला होता; पण इम्रान यांनी तो फेटाळल्याने मग पहिल्या पतीला ‘तलाक’ देऊन स्वत: बुशरा बिबींनीच इम्रान खान यांच्याशी ‘निकाह’ केला, असेही पाकिस्तानात सर्रास बोलले जाते.

इम्रान यांच्यावर राजकीय संकट कोसळले तशी पाकिस्तानात सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांची तिसरी पत्नी बुशरा बिबीची… विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनीच हा आरोप केला होता. इम्रान यांच्या ‘बनीगाला’ या निवासस्थानी बुशरा सतत जादूटोणा करत होत्या. हजारो कोंबडे त्यांनी जिवंत जाळले. तथापि, हे सारे काही उपयोगात आले नाही. अविश्वास प्रस्ताव मंजूर होऊन इम्रान यांना पायउतार व्हावे लागले.

यामुळे बसली श्रद्धा..!

2015 मध्ये लोधरान पोटनिवडणुकीत इम्रान यांच्या पक्षाचे उमेदवार जहाँगीर तरीन हेच जिंकतील, हे बुशरा यांचे पहिले भाकीत खरे ठरले आणि इम्रान यांची त्यांच्यावर श्रद्धा बसली. मग पुढे इम्रान नियमितपणे भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ लागले. लग्नावेळी इम्रान 66, तर बुशरा बिबी 44 वर्षांच्या होत्या.

कोण आहेत बुशरा बिबी?

बुशरा बिबींचा जन्म 16 ऑगस्ट 1974 रोजी पाकिस्तानातील पाकपट्टण शहरात राजकीय प्रभाव असलेल्या वट्टू कुटुंबात झाला. या शहरात बाराव्या शतकातील सुफी फकीर बाबा फरीद यांचा दर्गा आहे. बुशरा आणि इम्रान दोघेही बाबा फरीद यांचे भक्त आहेत. दोघांची पहिली भेटही या दर्ग्यातच झाली होती.

इम्रान यांच्या आधी बुशरा बिबीचे लग्न खावर मनेका यांच्याशी झाले होते. मनेका जमीनदार आहेत. ते कस्टम अधिकारीही होते. बेनझीर भुट्टो यांच्या सरकारमधील एक मंत्री गुलाम मोहम्मद यांचे ते चिरंजीव आहेत. मनेका यांच्यापासून बुशरा यांना 3 मुली, 2 मुले आहेत. इम्रान यांच्याशी लग्न करण्यासाठी 2017 मध्ये मनेकांपासून फारकत घेतली होती.

Back to top button