नाशिक : सावानातर्फे ना. नितीन गडकरी यांना कै. माधवराव लिमये कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर | पुढारी

नाशिक : सावानातर्फे ना. नितीन गडकरी यांना कै. माधवराव लिमये कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी स्व. माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार सन २०२०-२१ चा प्रथमच ना. नितीन गडकरी यांना देण्यात येणार आहे. हा समारंभ दि. १० फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी १२.३० वा. स्थळ – २, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली येथे ना. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी होत आहे. रु. ५० हजार रोख, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे.

या समारंभास प्रमुख पाहुणे ना. डॉ. भारती पवार, खा. डॉ.सुभाष भामरे, खा. हेमंत गोडसे, खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन सार्वजनिक वाचनालयाच्या फेसबुक पेज वरून प्रसारित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक वाचानलायाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे. यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदार यांना दिला जात होता. यावर्षीपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षा आड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत.

स्व. माधवराव लिमये हे नाशिकचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजवादी नेते होते त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. स्व. लिमये हे पत्रकार, लेखक व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांचा सार्वजनिक वाचनालयाशी घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या डॉ. शोभाताई नेर्लीकर व जावई डॉ. विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सार्वजनिक वाचनालय, नाशिक दरवर्षी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यापैकी एका सदस्याची निवड ही कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कारासाठी करीत असते.

खासदार हेमंत गोडसे, आमदार हेमंत टकले, पत्रकार सुरेखा टाकसाळे, पत्रकार जयप्रकाश पवार, अतुल कुलकर्णी, डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. शोभा नेर्लीकर व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, डॉ.धर्माजी बोडके या निवड समितीवर पुरस्कार निवडीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मागील १७ वर्ष अनुक्रमे सर्वश्री आ. बी.टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर.आर.पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा.रे.पाटील, पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, निलम गोऱ्हे, गिरीश महाजन, धनंजय मुंडे या मान्यवर आमदारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button