करमाळा तालुक्यातील वडशिवने ग्रामस्थांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार | पुढारी

करमाळा तालुक्यातील वडशिवने ग्रामस्थांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

केम, पुढारी वृत्तसेवा : करमाळा तालुक्यातील सर्वात मोठा तलावांपैकी एक वडशिवणे गावचा तलाव आहे. या तलावाखाली वडशिवने, कंदर, कविटगाव तसेच सांगवी गावातील एकूण 1440 एकर क्षेत्र पाण्याखाली येत होते. मात्र उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर कंदर, कविटगाव व सांगवी या गावांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे या गावांची वडशिवने तलावातील पाण्याचे गरज संपली. परंतु वडशिने गाव व त्यावरील केम, मलवडी, पाथर्डी, सातोली, घोटी व साडे इत्यादी गावांनाा या तलावातील पाण्याची अद्यापही गरज पडते. वडशिवणे गावातील हा तलाव पाण्याने भरला तर वडशिवने सह केम, पाथर्डी, मलवडी, सातोली, घोटी या गावांना याचा लाभ होऊ शकतो. यामुळे या गावातील जवळपास 3000 हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येऊ शकते .

मागील 40 वर्षापासून विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने निवडून यायच्या अगोदर आणि निवडून आल्यानंतर फक्त आश्वासन देण्यापलीकडे काहीही केले नाही. दिगंबर बागल दहा वर्ष, शामलताई बागल पाच वर्षे, जयवंतराव जगताप दहा वर्ष, नारायण आबा पाटील पाच वर्ष, संजय मामा शिंदे पाच वर्ष एकूण 35 वर्षांमध्ये नारायण पाटील सोडले तर एकाही लोकप्रतिनिधीने वडशिवणे तलावात कायमस्वरूपी पाणी आणावे असे वाटले नाही. निवडणुकीमध्ये मत मागायला यायचे असेल तर वडशिवने तलावात पाणी सोडण्यासंदर्भात ठोस कारवाईचे पत्र घेऊनच यावे अन्यथा येऊ नये, असा दृढनिश्चय वडशिवणे ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत वडशिवणे तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वडशिवणे ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत वडशिवणे ग्रामपंचायतीने ठराव करून ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button