Jaysingpur Fire : जयसिंगपूरात दुकानाला भीषण आग; २१ जण अडकल्याने उडाली धावपळ | पुढारी

Jaysingpur Fire : जयसिंगपूरात दुकानाला भीषण आग; २१ जण अडकल्याने उडाली धावपळ

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव बँकेलगत असलेल्या समृध्दी इलेक्ट्रीकल या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली. या दुकानावर असलेल्या फिनिक्स इन्फोटेकमध्ये तब्बल २१ मुले व मुली अडकल्याने एकच धावपळ उडाली. मोठ्याप्रमाणात धुराच्या लोट निघत असल्याने मुलांना श्वसन करण्यास अडथळा निर्माण झाल्याने भियभित अवस्थेत मुलांनी आरडाओरडा केली. अखेर पालिकेच्या अग्निशमन दलाने पाचारण केल्यानंतर या २१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी (दि. ७) दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनानेने जयसिंगपूर परिसरात एकच खळबळ उडाली होती. (jaysingpur fire)

याबाबत अधिक माहिती अशी, सांगली-कोल्हापूर महामार्गावर पोलिस स्टेशनच्या समोर समृध्दी इलेक्ट्रीकचे दुकान आहे. दुकान मालक हे सोमवारी दुपारी १ च्या सुमारास दुकान बंद करून जेवण्यासाठी घरी गेले होते. अशातच शॉर्ट सर्किटने दुकानाला आग लागली. दुकानात इलेक्ट्रीक व प्लॉस्टिक साहित्य असल्याने आगीबरोबरच मोठ्याप्रमाणात धुराचे लोट बाहेर निघत होते. या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर फिनिक्स इन्फोटेक्सचे क्लासेस आहेत. यात २१ मुले व मुली उपस्थित होते. आग लागल्यानंतर धुर पहिल्या मजल्यावर गेला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना धुराच्या कोंडमाड्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे भयभित झालेल्या मुलांनी खिडकीजवळ आम्हांला वाचवा अशी आरोळी दिली. नागरीकांनी तात्काळ पालिकेच्या अग्निशमनदल व पोलिसांना पाचारण केले. (jaysingpur fire)

पोलिसांनी गर्दी हटविली. अग्निशमन दलाने तत्काळ अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका केली व आगीवर नियंत्रण आणले. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे मोठ्याप्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. आग विझविण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या आगीत इलेक्ट्रीक दुकानाचे लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने पहिल्या मजल्यावर आग न गेल्याने संगणकीय ज्ञान घेणार्‍या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. (jaysingpur fire)

Back to top button