Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव ‘अशी’ कमगिरी करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू! | पुढारी

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव ‘अशी’ कमगिरी करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) ६ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात नाबाद 34 धावा केल्या. यादवने या सामन्यात भारताला विजयाची चव तर चाखवलीच, पण एक मोठा आणि अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा दणदणीत पराभव केला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलने वेस्ट इंडिजच्या 4 फलंदाजांना माघारी धाडले. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवनेही नाबाद 34 धावांची शानदार खेळी केली. भारतीय संघाने 3 वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या या विजयात सर्व खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. कर्णधार रोहितनेही चांगली सुरुवात केली. कर्णधार रोहितनंतर सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) विजयी योगदान दिले. यादवने 34 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीदरम्यान सूर्यकुमारने दीपक हुडासोबत 5व्या विकेटसाठी 62 धावांची मॅचविनिंग भागीदारी केली.

एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या 5 डावात 30 पेक्षा जास्त धावा करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारने वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 5 डाव खेळले आहेत आणि त्याने 5 डावात 31*, 53, 40, 39 आणि 34* धावा केल्या आहेत. म्हणजेच आतापर्यंत त्याने एक अर्धशतकही ठोकले आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर 177 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते, जे रोहितसेनेने 28 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. अशा प्रकारे भारताने हा सामनाही 132 चेंडूंच्या मोठ्या फरकाने जिंकला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद 34 धावाशिवाय दीपक हुडाही 26 धावांवर नाबाद राहिला.

सूर्यकुमारच्या (suryakumar yadav) आधी हा विक्रम माजी सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावावर होता. सिद्धू यांनी सलग 4 डावात 30 प्लस धावा केल्या होत्या. मात्र आता सूर्यकुमार यादवने 5व्या डावात 30 प्लस धावा करून सिद्धूचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

Back to top button