द्वेषपूर्ण भाषणे नको, दहा वर्षांतील कामावर बोला; काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे पीएम मोदींना पत्र | पुढारी

द्वेषपूर्ण भाषणे नको, दहा वर्षांतील कामावर बोला; काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे पीएम मोदींना पत्र

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गें यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठ दिवसांत आज दुसरे (दि. 2) पत्र लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या उमेदवारांना पत्र लिहिले, त्या पत्राचा संदर्भ देत मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्र लिहिले आहे. द्वेषपूर्ण भाषणे करण्याऐवजी तुमच्या सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील कामगिरीवर मते मागितली तर बरे होईल, अशा शब्दांमध्ये मल्लिकार्जुन खर्गेंनी पत्रांद्वारे पंतप्रधानांवर घणाघात केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला. खर्गेंनी पत्रांमध्ये म्हणले आहे की, “तुम्ही एनडीएच्या सर्व उमेदवारांना मतदारांशी काय संवाद साधण्याची गरज आहे, याविषयी लिहिलेले पत्र मी पाहिले. पत्रातील सूर आणि आशयावरून असे दिसते की, तुमच्यामध्ये खूप निराशा आणि चिंता आहे. तसेच तुमच्या भाषणातील खोटेपणाचा तुम्हाला अभिप्रेत असलेला परिणाम होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या उमेदवारांना खोटे बोलावे लागत आहे. एक हजार वेळा खोटे बोलून ते सत्य होणार नाही.”

प्रत्येक भारतीय आमची ‘व्होटबँक’- काँग्रेस अध्यक्ष खर्गे

पंतप्रधान मोदींच्या आरोपांना उत्तर देताना खर्गेंनी लिहिले की, “तुम्ही दावा करता की, आरक्षण एससी, एसटी आणि ओबीसीमधून काढून “आमच्या व्होटबँक” ला दिले जाईल. आमची व्होटबँक प्रत्येक भारतीय आहे. गरीब, उपेक्षित, महिला, महत्वाकांक्षी तरुण, कामगार वर्ग, दलित आणि 1947 पासून प्रत्येक टप्प्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने आरक्षणाला विरोध केला हे सर्वांना माहीत आहे.”

खर्गेंचे पंतप्रधानांना 25 एप्रिलला पहिले पत्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 25 एप्रिलला पहिले पत्र लिहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी पत्र लिहून काँग्रेसचा जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता.

Back to top button