गडचिरोलीत शिवसेना नेत्याला राष्ट्रीय दुखवट्याचा विसर | पुढारी

गडचिरोलीत शिवसेना नेत्याला राष्ट्रीय दुखवट्याचा विसर

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा; गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सरकारने देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे कटआऊट त्यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवसाआधीच आणि लतादीदींच्या निधनाच्या दिवशीच लावल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

६ फेब्रुवारीला सकाळी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. सरकारने देशात ६ व ७ फेब्रुवारी असे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. शिवाय ७ तारखेला राज्यात सार्वजनिक सुट्टीही जाहीर करण्यात आली. गडचिरोलीत मात्र शिवसेनेच्या किरण पांडव नामक नेत्याने अतिउत्साह दाखवला आहे. किरण पांडव हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत.

राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून पांडव यांचा जिल्ह्यात वावर वाढला आहे. नुकत्याच झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वी त्यांची शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गडचिरोलीत आले की, त्यांचे मोठमोठे होर्डिंग्ज लावण्याचे काम किरण पांडव करीत असतात. विशेष म्हणजे, पांडव हे बरेचदा शिवसेनेच्या जिल्ह्यातीन अन्य नेत्यांचे फोटो आणि नावेही टाकत नाही.

९ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त किरण पांडव यांनी गडचिरोली शहरातील चौकात तीन कटआऊट लावले. विशेष म्हणजे, ६ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्याच दिवशी दुपारनंतर हे कटआऊट लावण्यात आले.

देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर आणि शिंदे यांच्या वाढदिवसाला दोन दिवस बाकी असतानाही किरण पांडव यांनी कटआऊट लावण्याची हौस दाखविल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाचे पांडव यांना दु:ख झाले नाही काय, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

Back to top button