तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे भाजपसह विरोधी पक्षांचे लक्ष | पुढारी

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे भाजपसह विरोधी पक्षांचे लक्ष

ताजेश काळे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दोन टप्प्यातील मतदानामध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचा अंदाज बांधला जात असतानाच आता ७ मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे भाजपसह सर्वच विरोधी पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ९४ मतदारसंघात गेल्या निवडणुकीप्रमाणे यश मिळेल, असा भाजपचा विश्वास आहे. विरोधी पक्ष मात्र, या विश्वासाला तडा देऊन भाजपला आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांमधील ९५ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार होते. मात्र, गुजरातच्या सुरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता ९४ मतदारसंघात मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ९४ जागांपैकी ७७ जागा जिंकल्या होत्या. उर्वरित ८ जागांवर भाजपच्या मित्र पक्षांनी विजय मिळविला होता. विरोधी पक्षांच्या खात्यात फक्त ९ जागा होत्या. त्यामध्ये काँग्रेसच्या ४ जागांचा समावेश होता. २०१४ मधील निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात भाजपला ६६ जागा मिळाल्या होत्या.

गेल्या निवडणुकीत भाजपने मित्र पक्षांसह १५ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेला ३ तर लोक जनशक्ती पक्षाला १ जागा मिळाली होती. भाजपने त्यावेळी ७० जागा जिंकून विरोधी पक्षांना मागे टाकले होते. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला तिसऱ्या टप्प्यात चांगले यश मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. विरोधी पक्षांनी अधिक प्रयत्न करून भाजपला या जागा जिंकण्यापासून रोखल्यास त्याचा निवडणूक निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मतदान होऊ घातलेल्या १२ राज्यांमधील ९४ लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील ११ जागांचा समावेश आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ७ तर मराठवाड़ा आणि कोंकण क्षेत्रातील प्रत्येकी २ जागा आहेत. याशिवाय आसाम (४), बिहार (५), छत्तीसगढ़ (७), गोवा (२), गुजरात (२६), कर्नाटक (१४), मध्य प्रदेश (८), उत्तर प्रदेश (१०), पश्चिम बंगाल (४), दादरा व नगर हवेली, दमन व दीव (२) आणि जम्मू – कश्मीर (१) आदी जागांवर मतदान पार पडणार आहे. गेल्यावेळी महाराष्ट्रातील ११ जागांपैकी ८ जागा भाजप व मित्र पक्षांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा पुन्हा जिंकण्याचे भाजपपुढे आव्हान आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button