नाशिक : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नांदगाव महाविद्यालय वनश्री पुरस्काराने सन्मानित | पुढारी

नाशिक : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नांदगाव महाविद्यालय वनश्री पुरस्काराने सन्मानित

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव येथील मविप्र संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वनेतर क्षेत्रात वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन यामध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावत महाविद्यालयाने राज्यातून हा पुरस्कार प्रथम क्रमांकाने पटकवला आहे. एक लाखाचा धनादेश, मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथील यशदाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील होते. तसेच वन विभागाचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉक्टर सुनीता सिंग यांच्यासह राज्यातील वने, पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्था व त्यांचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. मविप्रचे सरचिटणीस  ॲड. नितीन ठाकरे, अमित पाटील, प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. टी. देवरे यांनी पुरस्कार स्विकारला. नांदगाव महाविद्यालयाने परीसरात झाडे लावून संपूर्ण परीसर हरीत बनवला असून विविध उपक्रम राबवत जलसंधारणाची काम केल्याने २०१८-१९ मध्येच महाविद्यालयास हा पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु कोरोना कालावधीमुळे तीन वर्षाच्या कालावधीनंतर महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नांदगाव महाविद्यालय हे नेहमीच वेगवेगळी उपक्रम राबवत असते. त्यात निसर्ग संरक्षण संदर्भातील उपक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. भविष्यात देखील असेच उपक्रम राबविण्याचे प्रयत्न राहणार आहेत. – आमित पाटील, संचलक म.वि प्र.

हेही वाचा:

Back to top button