Tech layoffs | मायक्रोसॉफ्टच्या ‘या’ कंपनीने भारतीय इंजिनिअर्सच्या संपूर्ण टीमला काढले, १४२ जणांवर बेरोजगारीची वेळ | पुढारी

Tech layoffs | मायक्रोसॉफ्टच्या 'या' कंपनीने भारतीय इंजिनिअर्सच्या संपूर्ण टीमला काढले, १४२ जणांवर बेरोजगारीची वेळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या (Microsoft-owned) इंटरनेट होस्टिंग सेवा पुरवणाऱ्या गिटहब (GitHub) ने भारतातील १४२ अभियंत्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. “एकूण १४२ अभियंत्यांना GitHub India मधून काल (सोमवार) जावे लागले. कामावरून काढून टाकलेल्या अभियंत्यांना मोबदला म्हणून दोन महिन्यांचे वेतन दिले गेले आहे,” असे वृत्त बिझनेस टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (Tech layoffs)

दुसऱ्या एका सूत्राने म्हटले आहे की, ही नोकरकपात कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारे नव्हती. GitHub मधील अभियंत्यांच्या संपूर्ण टीमला घरी जाण्यास सांगण्यात आले. यामुळे शेकडो अभियंत्ये बेरोजगार झाले आहेत.” नोकरीवरुन काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना बदल्यात कठोर नॉन-डिस्क्लोजर करारावर (NDA) स्वाक्षरी करण्यास सांगितले गेले, असेही सूत्राने पुढे म्हटले.

GitHub ने या नोकरकपातीच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले की, “फेब्रुवारीमध्ये शेअर केलेल्या पुनर्रचना योजनेचा एक भाग म्हणून आमच्या व्यवसायाचे हीत लक्षात घेऊन ही नोकरकपात करण्यात आली आहे. हा निर्णय कठोर असला तरी आवश्यक होता.”

गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या या कंपनीने जाहीर केले होते की ते खर्च कमी करण्यासाठी १० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकतील. GitHub चे जागतिक स्तरावर सुमारे ३ हजार कर्मचारी आहेत.

गिटहबचे सीईओ थॉमस डोह्मके यांनी कर्मचार्‍यांना ईमेल पाठवले होते. या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, “आम्ही अनेक कठीण निर्णय जाहीर करत आहोत, ज्यात काही कर्मचाऱ्यांना निरोप देणे आणि नवीन आर्थिक पुनर्रचना लागू करणे याचा समावेश असेल.”
Microsoft ने GitHub चा २०१८ मध्ये ताबा मिळवला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Microsoft चे CEO सत्या नडेला यांनी, GitHub चा वार्षिक महसूल १ अब्ज डॉलर असल्याचे म्हटले होते. (Tech layoffs)

हे ही वाचा :

Back to top button