

यवत(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : केडगाव येथील एका अल्पवयीन मुलाला अपहरण करून रेल्वे रुळाखाली टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) संध्याकाळी घडली असून याप्रकरणी यवत पोलिसांत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश शिवाजी शेळके (वय 43, रा. केडगाव स्टेशन शिंदे हॉस्पिटल, ता. दौंड) यांचा मुलगा शुभम शेळके याला संशयित बाळासाहेब ऊर्फ महेंद्र सोडणावर (रा. केडगाव, ता. दौंड) आणि बाळासाहेब भागुजी रुपनवर (रा. दापोडी, ता. दौंड) या दोघांनी मारहाण केली. त्यानंतर त्याचे स्कॉर्पिओ (एमएच 42 एडी 8055) गाडीत बसवून अपहरण केले.
तसेच त्याचे हातपाय बांधून त्यास जिवे मारण्याच्या उद्देशाने रेल्वे गाडीखाली फेकून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शुभम शेळके यांनी तक्रारीमध्ये केला आहे. यातील दोन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे करीत आहेत.