परभणी : पक्षी मित्राने ९१ दिवस गव्हानी घुबडाचे केले संगोपन | पुढारी

परभणी : पक्षी मित्राने ९१ दिवस गव्हानी घुबडाचे केले संगोपन

जिंतुर : पुढारी वृत्तसेवा

वाघी बोबडे (तालुका जिंतूर, जिल्हा परभणी) येथून विनायक कवठेकर यांचा फोन आला की, शाळेत दोन जखमी घुबडांची पिल्लं आहेत. या गावात शाळेच्या आवारात असलेल्या पाम वृक्षाच्या वाळलेल्या खोडात दोन गव्हाणी घुबडांची पिल्लं होती. झाड वाळलेलं असल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वृक्षाचे वाळलेलं खोड तोडण्यात आलं. त्यात ती दोन पिल्ले बेघर झाली. एका पिल्लाला पायाला गंभीर जखम झाली होती. ते पिल्लू जिवंत राहू शकले नाही. दुसरं पिल्लू पक्षी मित्र अनिल उरटवाड यांनी परत त्या घरट्यात सोडणं शक्य नसल्यामुळे ते घरी घेऊन गेले.

घरी त्याला आश्रय दिला. २७ डिसेंबर २०२१ ला ही घटना घडली होती. पिल्ले जन्म होऊन अंदाजे पंधरा ते आठरा दिवस झाले असावेत. गव्हाणी घुबडाला सुरुवातीच्या काळात पिल्लू असताना ५० ग्रॅम चिकन रोज रात्री लागत असे. हे पिल्लू हळूहळू मोठे झाल्यानंतर हे खाद्य १०० ग्रॅम पर्यंत वाढवते. रोज रात्री त्याला खाऊ घालणे हा नित्यक्रम झाला होता. ९१ दिवसांच्या काळजी, सोय आणि योग्य देखरेखीखाली असल्यामुळे पिलाने दि. २७ मार्च २०२२ रोजी निसर्गात मुक्त संचारासाठी भरारी घेतली.

घुबडाविषयी थोडक्यात- मराठी नाव :- गव्हाणी घुबड
इंग्रजी नाव :- बर्न आऊल (Barn Owl)
शास्त्रीय नाव :- टायटो अल्बा (Tyto Alba)

गव्हाणी घुबड हे मानवी वसाहतीजवळ जुने पडीक घरे आणि वाडयांच्या कपारीत किंवा झाडांच्या डोलीमध्ये घरटे तयार करतो. गव्हाणी घुबडाच्या शरिराच्या वरील भागाला तपकिरी रंग असतो. पोटाचा भाग पांढरा असून अंगावर काळे – पांढरे ठिपके असतात. डोके मोठ्या आकाराचे असते. चेहऱ्याला गडद रंगाची कडा असते. चोच आणि पायाची नखे अतिशय तीक्ष्ण असतात.

नर-मादी दिसायला सारखेच असतात. निशाचर असल्यामुळे रात्री शिकारीच्या शोधात बाहेर पडतात. दिवसा त्यांना कमी दिसत असल्यामुळे ते एका जागी शांत बसून असतात. गव्हाणी घुबडाच्या सुमारे वीस उपजाती आढळतात. त्यापैकी दोन प्रजाती भारतीय उपखंडात आढळून येतात. भारतात सर्वच पक्षी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षित आहेत. त्यांना पकडणे, मारणे, विकणे कायद्याचे उल्लंघन आहे.

अशा बेघर झालेल्या पक्षांची माहिती देऊन जागरुक नागरिकांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी मदत केली पाहिजे.
– अनिल उरटवाड (M.Sc. Zoology) ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी

 

Back to top button