‘केकेआर’ची फायनलमध्ये धडक; क्वालिफायर-1 लढतीत सनरायझर्स हैदराबाद पराभूत

‘केकेआर’ची फायनलमध्ये धडक; क्वालिफायर-1 लढतीत सनरायझर्स हैदराबाद पराभूत

अहमदाबाद; वृत्तसंस्था : गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. 2014 नंतर पुन्हा एकदा त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात 'केकेआर'ने सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेटस्नी दणदणीत विजय मिळवला. 2021 नंतर 'केकेआर' फायनल खेळणार आहेत. हैदराबादला आता राजस्थान रॉयल्स वि. आरसीबी यांच्यातील आज होणार्‍या सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर-2 मध्ये खेळून फायनलमध्ये धडक देण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

संपूर्ण सत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या 'केकेआर' संघाने प्ले-ऑफमध्येही आपला धडाका कायम ठेवला. क्वालिफायर-1 सामन्यात त्यांनी हैदराबादला 159 धावांत गुंडाळले, त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नारायण व रहमानउल्ला गुरबाज यांनी 'केकेआर'ला दमदार सुरुवात करून दिली आणि नशीबही त्यांच्याच बाजूने असल्याचे दिसले. हैदबादने पहिल्या तीन षटकांत दोन्ही 'डीआरएस' गमावले आणि याने त्यांचे मनोबल खचले. टी नटराजनने चौथ्या षटकात संघाला यश मिळवून देताना गुरबाजला (23) माघारी पाठवले. 'केकेआर'ला 3.2 षटकांत 44 धावांवर पहिला धक्का बसला. परंतु, त्यांनी पॉवर प्लेमध्ये 1 बाद 63 धावा करून पाया मजबूत केला. सातव्या षटकात पॅट कमिन्सने शॉर्ट बॉलवर नारायणला (21) झेलबाद करून माघारी पाठवले. 10 व्या षटकात श्रेयस अय्यरचा झेल उडाला होता आणि हेन्रिक क्लासेनने तो टिपलाही होता. परंतु, राहुल त्रिपाठीही हा झेल घेण्यासाठी पळाला आणि क्लासेनच्या हातून चेंडू निसटला. पुढच्याच षटकात ट्रॅव्हिस हेडने 'केकेआर'च्या कॅप्टनचा सोपा झेल टाकला.

श्रेयस अय्यर व वेंकटेश अय्यर यांनी डाव सावरला. वेंकटेशने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ श्रेयसने 3 खणखणीत षटकार खेचून 23 चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि 13.4 षटकांत संघाचा विजयही पक्का केला. कोलकातानने 2 बाद 164 धावा करून बाजी मारली. 'केकेआर'ने तब्बल 38 चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. श्रेयस 24 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला. वेंकटेशनेही 28 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 51 धावा केल्या. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 44 चेंडूंत 97 धावा झोडल्या.

तत्पूर्वी, स्टार्कने पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला आणि पाचव्या षटकात नितीश रेड्डी (9) व शाहबाज अहमद (0) यांना सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवले. वैभव अरोराने दुसर्‍या षटकात हैदराबादचा दुसरा सलामीवीर अभिषेक शर्माला (3) बाद करून संघाला मजबूत पकड मिळवून दिली. पॉवर प्लेमध्ये हैदराबादची अवस्था 4 बाद 45 अशी दयनीय झाली होती. जीवदान मिळालेला त्रिपाठी आणि क्लासेन यांनी 37 चेंडूंत 62 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले होते; पण वरुण चक्रवर्थीने ही जोडी तोडली. क्लासेन 21 चेंडूंत 32 धावांवर बाद झाला.

त्रिपाठी 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 55 धावांवर रन आऊट झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हैदराबादने सनवीर सिंगला पाठवले. परंतु, सुनील नारायणने चतुराईने त्याचा त्रिफळा उडवला. अब्दुल 12 चेंडूंत 16 धावांवर हर्षित राणाला विकेट देऊन माघारी परतला. भुवनेश्वर कुमारला भोपळ्यावर वरुण चक्रवर्थीने पायचीत केले. वरुणने 26 धावांत 2 विकेटस् घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्सने 24 चेंडूंत 30 धावा केल्या. हैदराबादचा संघ 19.3 षटकांत 159 धावांवर माघारी परतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news