

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरात आग लागल्याने धुरात गुदमरून एकाचा मृत्यू झाल्याची घटना काठे गल्ली येथील बनकर चौकात घडली. ऋषिकेश श्याम पाटील (44) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनकर चौकातील शुभवास्तू नावाच्या अपार्टमेंटमध्ये ऋषिकेश पाटील हे त्यांच्या आईसह राहत होते. शनिवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून धूर येऊ लागल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवली.
शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातून फायरमन हेमंत बेळगावकर, शिवाजी फुगट, दिनेश लासुरे, राजेंद्र नाकील, बंबचालक महेश कदम हे बंबासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी दरवाजा आतमधून बंद असल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. भद्रकाली पोलिसांचे गस्ती वाहन घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. यावेळी पोलिसांच्या समक्ष जवानांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी संपूर्ण घर धुराने गच्च भरलेले होते. जवानांनी घरातील वृद्ध आजीबाईंना त्वरित सुखरूप बाहेर काढले. पेटलेल्या खोलीत पाण्याचा मारा करून आग विझविली.
पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. सुदैवाने आग दुसर्या खोलीत पोहोचली नाही, यामुळे पाटील यांच्या वृद्ध मातोश्री या घटनेत बालंबाल बचावल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, धुरामुळे गुदमरून ऋषिकेश यांचा मृत्यू झाल्याचे भद्रकाली पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.