नवऱ्यावर संशयाचे भूत; रागात आईने घोटला पोटच्या मुलीचा गळा

file photo
file photo

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या पतीचे इतर तरुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने रागाच्या भरात स्वतःच्या तीन वर्षीय मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह घेऊन ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि आपणच खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या संशयाच्या भुताने पछाडलेल्या व आपल्याच चिमुकलीचा काटा काढणाऱ्या आईवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. ट्विंकल रामा राऊत (२४, रा. एस ४४, बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी, एमआयडीसी) असे या संशयित महिलेचे नाव असून रियांशी (३) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

आरोपी महिला ट्विंकल ही रामा लक्ष्मण राऊत याच्यासोबत २०२० पासून 'लिव्ह इन रिलेशनशीप'मध्ये वास्तव्याला असून दोघेही बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी एमआयडीसीत काम करतात. त्यांना ५ फेब्रुवारी २०२१ रोजी रियांशी नावाची चिमुकली झाली. परंतु, ट्विंकल आणि रामा हे नेहमीच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊन आपसात भांडत होते. सोमवारी (दि.२०) ट्विंकल आणि रामा दोघेही सकाळी ८ वाजता कंपनीत कामाला गेले. दरम्यान, कंपनीतून दुपारी १२ ते ३ दरम्यान रामा बाहेर गेला. ट्विंकलला नेहमीप्रमाणे संशय आल्याने पुन्हा भांडण झाले. इकडे रामा घरी झोपी गेला. ट्विंकल दुपारी ३.३० वाजता आपली चिमुकली रियांशीला घेऊन घराबाहेर पडली. दोन तास मुलीसह फिरत फिरत एका झाडाखाली तिने मुलीचा गळा दाबला.

ट्विंकलच्या आई- वडिलाचे निधन झाले असून ती स्वत: कष्ट करीत उदरनिर्वाह करीत होती. तिने स्वत:चे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला त्यापूर्वी मुलीला संपवण्याच्या उद्देशाने तिने मुलीचा गळा दाबला. तासाभरानंतर तिला या कृत्याचा पश्चाताप झाला. तिने स्वतः ची जीवनयात्रा संपविण्याचा निर्णयही बदलला. ती मृत मुलीला कडेवर घेऊन फिरत होती.

दरम्यान, तिने काही जणांना मुलीचा जीव घेतल्याची बाबही सांगितली. मुलीवर अंत्यसंस्कार करण्याचे तिने ठरविले. मात्र, तिला कुणीही मदत केली नाही. त्यानंतर ती एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे निघाली. रस्त्यातच तिला पोलिसांचे वाहन दिसले. त्यानंतर पोलिसांजवळ जात तिने घटनेबाबत माहिती दिली. ट्विंकलला पोलिसांनी ठाण्यात आणले. मुलीला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. या प्रकरणी रामाच्या तक्रारीवरून एमआयडीसीचे ठाणेदार प्रवीण काळे यांच्या पुढाकाराने गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news