मानवत; पुढारी वृत्तसेवा : अवैध वाळू वाहतूक प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यातील जप्त ट्रक सोडविण्याकरिता न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याकरिता ५० हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन रामभाऊ जंत्रे व मुंतसीर खान पठाण या दोघांना परभणीच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२१) ताब्यात घेतले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वाळूची वाहतूक करणाऱ्या शहरातील एका २७ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून सदरील कारवाई करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात ट्रक व ट्रक चालकास पोलिसांनी पकडून काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील जप्त ट्रक सोडविण्याकरिता न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक जंत्रे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती, परंतु तडजोडीने ७० हजार रुपये देण्याचे ठरले.
याप्रकरणी तक्रारदारने परभणीच्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे रविवारी (दि.१९) तक्रार दाखल केली. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. जंत्रे यांनी पोलीस ठाण्याच्या त्यांच्या कक्षात तडजोडीचे ठरलेले ७० हजार पैकी ५० हजार रुपये शहरातील खाजगी इसम मुंतसीर पठाण उर्फ बब्बूभाई यांच्याकडे देण्यास सांगत उर्वरित २० हजार रुपये न्यायालयात रिपोर्ट सादर केल्यानंतर द्या असे सांगितले. त्यानंतर पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मुंतसीर पठाण याने तक्रारदार यांचेकडून मोटारसायकलवर बसून ५० हजाराची लाच स्वीकारत पळ काढला.
यानंतर पोलिसांनी पठाणचा शोध घेत त्यासह पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर कारवाई परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केली .