चला जाणून घेऊया, निरोगी आयुष्याचा मूलमंत्र! | पुढारी

चला जाणून घेऊया, निरोगी आयुष्याचा मूलमंत्र!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘पुढारी’ समूहातर्फे दि. 2 ते 4 जुलै दरम्यान ‘आरोग्य संवाद’अंतर्गत ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजिण्यात आली आहे. हृदयविकार, कर्करोग हे आजार, उपचार तसेच हे आजार उद्भवू नयेत म्हणून अंगीकारण्याची आयुर्वेदिक जीवनशैली, याबाबतचे त्रिसूत्री मार्गदर्शन या तीन दिवसीय व्याख्यानमालेतून उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावर कीर्ती मिळविलेल्या डॉक्टरांचा सहभाग, हे ‘पुढारी आरोग्य संवाद’ या व्याख्यानमालेचे खास वैशिष्ट्य आहे.

कोरोना व कोरोनानंतरच्या काळात आरोग्य हा सर्वाधिक कळीचा मुद्दा बनलेला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन ‘पुढारी’ने दरवर्षी ‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून ‘आरोग्य संवाद’ या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन सुरू केले. कोरोना काळात खास सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत सलग तीन दिवस व्याख्यान असेल. डॉ. संदीप पाटील हे या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन करतील.

व्याख्यानमालेचा प्रारंभ 2 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता होईल. कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट डॉ. ऋतुपर्ण शिंदे हे ‘निरोगी हृदयाची गुरुकिल्ली’ या विषयावर उद्बोधन करणार आहेत. हृदयविकार ही सध्या आरोग्याच्या क्षेत्रातील एक मोठी समस्या आहे. पूर्वी हा आजार एका विशिष्ट वयात व परिस्थितीत होत असे. आता हृदयविकाराने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत, याउपर त्याला निर्बंध कसे घालता येऊ शकतात, या द‍ृष्टीने डॉ. शिंदे यांचे उद्बोधन उपयुक्‍त ठरणार आहे.

व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प विख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. परिक्षित शेवडे हे गुंफणार आहेत. ‘आयुर्वेद आणि जीवन’ हा त्यांचा विषय असेल. अनेक आंतरराष्ट्रीय चिकित्सा परिषदांमध्येही यापूर्वी त्यांची व्याख्याने झालेली आहेत. ते ‘श्री व्यंकटेश आयुर्वेद’ या संस्थेचे संस्थापक आहेत. भविष्यातील संभाव्य आजारांना रोखता यावे, यासाठी दैनंदिन आहार व दिनचर्या कशी असावी, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

व्याख्यानमालेचा समारोप ‘मेरी-क्युरी फेलो’ तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैद्यकीय विज्ञान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाने होईल. ‘कशी कराल कॅन्सरवर मात?’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. डॉ. थोरात हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मायणीचे आहेत आणि विटा येथे रयत शिक्षण संस्थेत त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. आणि डी. वाय. पाटील विद्यापीठातून सुवर्णपदकासह त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळविली आहे.

पुढे दक्षिण कोरियातील सॅमसंग बायोमेडिकल इन्स्टिट्यूटमधून कॅन्सरवर संशोधन कार्य त्यांनी केले. आयर्लंड, पोलंड, स्वित्झर्लंड, जर्मनीतही कॅन्सर तसेच संसर्गजन्य आजारांवर मोलाचे संशोधन त्यांनी केले. जवळपास साडेतीन कोटी रुपयांची मिळून ‘युरोपियन युनियन’ची ‘मेरी-क्युरी फेलो’ ही फेलोशिप तब्बल दोनवेळा मिळविणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय आहेत.

कॅन्सर हा परवापरवापर्यंत बरा न होऊ शकणारा एक दुर्धर असा आजार होता. आता अलीकडच्या काळात त्यावर बर्‍यापैकी मात मिळविण्यात आरोग्यशास्त्राला यश येत आहे. ‘पुढारी आरोग्य संवाद’ व्याख्यानमालेत ते सर्व बाबींचा तपशीलवार ऊहापोह करतील.

आरोग्यमय जीवन जगण्याच्या द‍ृष्टीने तिन्ही व्याख्याने अत्यंत उपयुक्‍त व दिशादर्शक ठरणार आहेत. नागरिकांनी ही व्याख्याने पाहावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. व्याख्याने पाहण्यासाठी र्िीवहरीळेपश्रळपश या फेसबुक पेजला लाईक करून सहभागी व्हा.

आरोग्य संवाद कार्यक्रम

  • 2 जुलै ‘निरोगी हृदयाची गुरुकिल्ली’ डॉ. ऋतुपर्ण शिंदे (कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट)
  • 3 जुलै ‘आयुर्वेद आणि जीवन’ डॉ. परिक्षित शेवडे (विख्यात आयुर्वेद तज्ज्ञ)
  • 4 जुलै ‘कशी कराल कॅन्सरवर मात?’ डॉ. नानासाहेब थोरात (‘मेरी-क्युरी फेलो’ ऑक्सफर्ड विद्यापीठ)

व्याख्याने पाहण्यासाठी pudharionline या फेसबुक पेजला लाईक करून सहभागी व्हा.

https://www.facebook.com/Pudharionline/

Back to top button