मोशी : पाणीपुरवठा विस्कळीत; गांधीनगरचे रहिवासी त्रस्त | पुढारी

मोशी : पाणीपुरवठा विस्कळीत; गांधीनगरचे रहिवासी त्रस्त

मोशी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी केलेल्या शटडाऊनला सात दिवस होत आले तरीही अद्याप मोशी भागातील पाणी पुरवठा पूर्वपदावर आलेला नसून विस्कळीत पाणी पुरवठा व्यवस्थेमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

याबाबत अधिकारी आणि प्रशासन नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असून येत दोन दिवसात पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत होईल असे सांगितले आहे.दोन दिवसात प्रश्न न सुटल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा माजी नगरसेविका सारिका बोर्‍हाडे यांनी दिला आहे.

मोशी भागातील संजय गांधी नगर,विनायक नगर,शिवरस्ता सर्व सोसायट्या,वुडस व्हिला फेज एक,दोन,तीन,सोसायटी ,देहूरस्ता ,इंद्रायणी पार्क,गायकवाड वस्ती,नागेश्वर नगर,संभाजी नगर आदी भागांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने व अनियमित होत आहे.यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.याबाबत पुढारीने पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल ईदे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की येत्या दोन दिवसात संपूर्ण ठिकाणचा पाणी पुरवठा सुरळीत होईल.

साधारण शटडाऊन नंतर अशी परिस्थिती निर्माण होत असते ती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ जातो. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले असून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत.
एकंदरीतच मोशी भागातील नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थेच्या तांत्रिक अडचणी मुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असून परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणली जावी अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

Back to top button