नागपूर : महिलेच्या मृत्यूप्रकरणी मेडिकलच्या अधिष्ठात्यासह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

नागपूर : महिलेच्या मृत्यूप्रकरणी मेडिकलच्या अधिष्ठात्यासह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शस्त्रक्रिया दरम्यान निष्काळजीपणामुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण मेडिकलमधील अधिष्ठात्यांसह डॉक्टरांना चांगलेच अंगलट आले आहे. एकाच वेळी ११ जणांविरोधात पाच वर्षानंतर न्यायालयीन आदेशानुसार अजनी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने मेडिकल प्रशासन हादरले आहे. याप्रकरणी केवलराम पांडुरंग पटोले (रा. विठ्ठल नगर हुडकेश्वर, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

केवलराम हे जिल्हा न्यायालयाचे निवृत्त अधीक्षक असून २०१९ मध्ये वर्तमान अधिष्ठाता गजभिये हे शस्त्रक्रिया विद्या विभागाचे प्रमुख होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केवलराम यांच्या पत्नी पुष्पा यांच्या मानेच्या समोरील भागाला गाठ झाली. उपचारासाठी मेडिकलमध्ये २ जुलै २०१९ रोजी दाखल केले. त्यावेळी डॉ गजभिये यांनी पुष्पा यांची तपासणी केली. तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ५ जुलैला सकाळी पुष्पा यांना मेडिकलच्या पेइंग वार्डमध्ये दाखल करण्यात आले. केवलराम व त्यांची मुलगी विभागातून बाहेर आलेल्या दोन डॉक्टरांना भेटले. पुष्पा हालचाल करीत नसून त्यांच्या डोळ्यावर कापूस लावलेला होता. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. अखेर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले व नंतर मृत घोषित केले. मेडिकलच्या कागदपत्रावर डॉ. गजभिये यांनी केवलराम यांना स्वाक्षरी करण्यास लावली. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने केवलराम यांनी मार्च २०२४ मध्ये न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश अजनी पोलिसांना दिले त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

मेडिकलमध्ये पुष्पा यांच्या मृत्यू प्रकरणी ५ तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली. या चौकशी समितीने पुष्पांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अहवाल दिला. या अहवालाला आव्हान देत तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्रालयात पती केवलराम यांनी तक्रार केली. चौकशीसाठी पुन्हा समिती स्थापन करण्यात आली. १५ डिसेंबरला समितीने शासनाला अहवाल सादर करीत रुग्णाची काळजी घेण्यात निष्काळजीपणा झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर पुन्हा अधिष्ठाता डॉ गजभिये आणि सहकारी डॉक्टरांविषयी तक्रार केली अखेर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button