कोल्हापूर : शिये फाटा बनला मृत्यूचा सापळा; शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष | पुढारी

कोल्हापूर : शिये फाटा बनला मृत्यूचा सापळा; शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

सुनील कांबळे

शिरोली एमआयडीसी : जोतिबा, पन्हाळ्यासह रत्नागिरीला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा दुवा म्हणून शिये फाट्याकडे पाहिले जाते. मात्र हा शिये फाटा मृत्युचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर काही निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. या घडलेल्या घटनांचा विचार करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात हयगय झाली. त्यामुळे हा रस्ता आणखी किती जीव हे घेणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

या रस्त्यावरून सतत क्रशर खडी, क्रश सॅंड यांची वाहतूक होत असते. अनेक वेळा वाहतूक करणाऱ्या डंपर मधून क्रश सॅंड, खडी रस्त्यावर सांडते, यावरून दुचाकी स्लिप होऊन अनेक अपघात घडले आहेत. बुधवारी (दि.८) झालेल्या अशाच अपघातात न्यायालयीन कर्मचारी महिलेला आपला जीव गमवावा लागला.

शिये फाटा पश्चिम भागात असलेल्या जोतिबा, पन्हाळ्यासह कोकणात रत्नागिरीला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यामध्ये कोकणात जाण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक भागातील लोकांना हा मार्ग सोयीचा आसल्यामुळे या रस्त्याचा वापर केला जातो. कर्नाटक राज्यातील अनेक भाविक याच रस्त्याने जोतिबा पन्हाळ्यासह विशाळगडावर जात असतात. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. याशिवाय या परिसरात दगड-खाणं क्रशर व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. टोप व शिये परिसरात दगड-खाणं व क्रशर शेकडोंच्या घरात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डंपर, ट्रक्टर, जेसीबी यासह अन्य अवजड वाहनांची सतत ये – जा सुरू असते. भरगच्च मालाची वाहतूक करणाऱ्या या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

यासह रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक टपऱ्या टाकण्यात आल्या आहेत. टपरीधारकांसह ग्राहकांची वाहने रस्त्यावरचं पार्कींग होत असतात. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघाताला निमंत्रण ठरतं आहेत. याशिवाय अनेक छोटे व्यवसाय रस्त्यावर मांडलेले असतात. अशा बाबीमुळेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या चौकात बसविण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे त्यांची देखभाल दुरुस्ती न केल्याने बंद आहेत. अनेक अडचणी या रस्त्यावर नेहमीच ‘आ वासून’ उभ्या राहिल्या आहेत. त्या दूर करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य हालचाली होत नाहीत, परिणामी अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे . शासकीय यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

शिये फाटा चौक हा नेहमीच वर्दळीचा आहे. याठिकाणी रस्त्यावर स्पिड ब्रेकर बसविण्यात यावेत. या परिसरात दगड-खाणं वाहतूक मोठी आहे. याठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनांची तपासणी व कारवाई केली पाहिजे. येथील रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याची गरज आहे.
पंकज गिरी
सहाय्यक पोलीस निरीक्षक
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे

Back to top button