गडहिंग्लजः हरळीच्या युवकाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू | पुढारी

गडहिंग्लजः हरळीच्या युवकाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू

महागाव: पुढारी वृत्तसेवा

ट्रॅक्टरला धडकून हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील प्रदीपकुमार सदाशिव पाटील हा ३४ वर्षीय युवक ठार झाला. बुधवारी (दि.२६) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील हरळी खुर्द गावाच्या बसस्थानकाजवळच्या ओढ्याजवळ ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

तो आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होता. हरहुन्नरी व समाजशील व्यक्तिमत्त्वाच्या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची गडहिंग्लज पोलिसात नोंद झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बुधवारी रात्री कामानिमित्ताने पॅशन प्रो मोटारसायकलवरून तो महागावला गेला होता.

काम आटोपून घरी परतत असताना हरळी बसस्थानकाजवळील राज्यमार्गावरील हाळे यांच्या घरासमोर महागावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला त्याच्या मोटरसायकलची जोराची धडक बसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला गडहिंग्लजला उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. मात्र गंभीर दुखापतीमुळे मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

तो आरोग्य सेवक म्हणून काम करीत होता. अनेक रुग्णांना त्याने शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला होता. मनमिळावू व कार्यतत्पर सेवाभावी वृत्तीमुळे त्याचा मित्र परिवार मोठा होता. आठ महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाले. या दुःखातून सावरत असतानाच त्याच्या या अपघाती मृत्यूची घटना सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची गडहिंग्लज पोलिसात नोंद झाली आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. शवच्छेदनानंतर आज सकाळी मतृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सेवक नव्हे देवदूतच..!

प्रदीप शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होता. गडहिंग्लज तालुक्यातील बहुतांशी रुग्णालयांकडे त्याने राजीव गांधी व महात्मा फुले जीवनदायी मोफत आरोग्य योजनेकडे काम केले आहे. अनेक गोरगरीब रुग्णांना आरोग्य योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान त्याने दिले आहे. त्यामुळे आजारपणामुळे सैरभैर व हताश झालेल्या रुग्णांना तो आरोग्य सेवक म्हणून नव्हे तर देवदूत म्हणूनच त्यांच्या पाठीशी उभा राहिल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

हेही वाचलत का?

Back to top button