बेळगाव : हल्ल्यानंतर पळणार्‍या खुन्यावर झाडल्या गोळ्या; नरगुंदजवळील घटना | पुढारी

बेळगाव : हल्ल्यानंतर पळणार्‍या खुन्यावर झाडल्या गोळ्या; नरगुंदजवळील घटना

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गदगमध्ये गाजलेल्या चौघांच्या खून प्रकरणातील संशयित पोलिस उपनिरीक्षकांसह अन्य पोलिसांवर हल्ला करून पळून जात होता. यावेळी पोलिस निरीक्षक धीरज शिंदे यांनी तत्परता दाखवत स्वसंरक्षणासाठी खुन्याच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत एका उपनिरीक्षकासह संशयित खुनी जखमी झाला. नरगुंदपासून अडीच किलोमीटरवर सोमवारी (दि. 29) सायंकाळी हा थरार घडला.

गदगमधील दासर गल्लीत 19 एप्रिलच्या मध्यरात्री एका कुटुंबातील तिघांसह घरी आलेल्या पाहुणा अशा चौघांचे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी आठजणांना अटक केली. त्यात मिरजमधील (जि. सांगली) पाचजणांचा समावेश आहे. निरीक्षक शिंदे सध्या बेटगेरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित व आरोपी क्रमांक दोन फैरोज निसारअहंमद खाजीने (वय 29, रा. राजीव गांधीनगर, गदग) खुनाची 65 लाखाला सुपारी घेतली होती. मिरजेला जाऊन अन्य संशयितांना बोलावून घेणे, पाळत ठेवणे, खुनाचे नियोजन करणे, हे सर्व त्यानेच केले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी एक मोबाईल फोडून तो नरगुंदजवळील नाल्याजवळ फेकल्याची माहिती शिंदे यांना मिळाली होती. ते उपनिरीक्षक शिवानंद पाटील व सहकार्‍यांसह फैरोजला घेऊन संबंधित ठिकाणी गेले. तिथे मोबाईलचे काही तुकडे सापडले. ते व संशयिताला घेऊन पुन्हा गदगला परतत होते.

नरगुंदपासून अडीच किलोमीटर असताना सायंकाळी 5.15 च्या सुमारास फैरोजने लघुशंकेला जायचे आहे, असे सांगितल्याने पोलिसांनी जीप थांबवली. फैरोज लघुशंकेसाठी बसला असता उपनिरीक्षक पाटील त्याच्या बाजूलाच थांबले होते. खाली बसलेला फैरोज हातात फुटलेल्या बिअर बाटलीची काच घेऊन अचानक उठला व त्याने उपनिरीक्षकांवर हल्ला केला. त्यात त्यांचा शर्ट फाटला. निरीक्षक शिंदे यांनी त्याला शरण येण्याचा इशारा दिला. परंतु, त्याने उपनिरीक्षकांवर पुन्हा हल्ला चढवला. शिंदे यांनी हवेत गोळीबार करुन इशारा दिला. परंतु, उपनिरीक्षकांना सोडून फैरोज अन्य पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना शिंदे यांनी त्याच्या डाव्या पायावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात तो जखमी झाला. त्याला ताब्यात घेत त्याच्यासह उपनिरीक्षकांना रुग्णालयात दाखल केले. जिल्हा पोलिसप्रमुख बी. एस. न्यामगौडा यांनी उपनिरीक्षक पाटील व संशयित आरोपीची भेट घेऊन विचारपूस केली.

सीपीआय धीरज शिंदेंचे कौतुक

चौघांच्या खून प्रकरणाची चर्चा राज्यभर झाली होती. परंतु, गदग पोलिसांनी तत्काळ तपास लावल्याने पोलिस महासंचालक अलोक मोहन यांनी पोलिस पथकाला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले. आता या प्रकरणातील संशयित पळून जाताना त्याला शिताफीने निरीक्षक शिंदे यांनी पकडले. त्यांच्या या तत्परतेचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी कौतुक केले.

हेही वाचा : 

Back to top button