गॅस कटरने एटीएम फोडून 12 लाखांची रोकड केली लंपास ; चोरटे सीसीटीव्हीत कैद | पुढारी

गॅस कटरने एटीएम फोडून 12 लाखांची रोकड केली लंपास ; चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव : प्रतिनिधी : जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावर आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून 12 लाख 78 हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. हे चोर चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले असून याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जामनेर शहराच्या पोलीस स्टेशन इमारतीचे 26 जानेवारीला सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याच रात्री जामनेर शहरातून पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय  बँक एटीएम रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले.

बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. चोरांनी अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे चोरून नेले. माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सदर बँकेच्या एटीएमजवळ सुरक्षारक्षक नसल्यामुळे एटीएममध्ये चोरी झाल्याची चर्चा नागरिकांत होत आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

Back to top button