जालना : कालव्यात स्कॉर्पिओ कोसळली अन् अपहरण उघडकीस | पुढारी

जालना : कालव्यात स्कॉर्पिओ कोसळली अन् अपहरण उघडकीस

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी शिवारातील डाव्या कालव्यात स्कॉर्पिओ कोसळली. या घटनेमुळे मादळमोही येथील व्यावसायिकाचे अपहरण झाल्याचा प्रकार २६  जानेवारी रोजी रात्री १० वाजता उघडकीस आला. व्यावसायिक हे बीड जिल्ह्यातील मादळमोही येथील असून त्यांचे नाव कैलास आसाराम शिंगटे आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून  २ कोटी रुपयांची मागणी केली व त्याला मारहाण केली.

अपहरण करून जात असताना स्कॉर्पिओचे डिझेल संपल्याने गाडी अंतरवाली सराटी शिवारातील १७ नंबर चारी जवळील डाव्या कालव्यात ढकलून दिली. यानंतर दुसरी गाडी बोलावून त्या ठिकाणाहून अपहरणकर्ते औरंगाबादकडे फरार झाले. औरंगाबाद सोलापूर मार्गावरील सौदंलगाव शिवारात कैलास शिंगटे यांना  गाडीतून खाली फेकून दिले. यानंतर कैलास यांनी जवळच्या हॉटेलवर येऊन घरी फोन करून घटनाक्रम सांगितला.

गोंदी पोलीस व वडीगोद्री येथील ग्रामस्थांना समजताच त्या ठिकाणी जाऊन त्यास वडीगोद्री येथील हॉस्पिटलमध्ये आणून प्राथमिक उपचार केले. यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांची मोठी गर्दी केली.  याप्रकरणी शिंगटे यांनी गोंदी पोलिसांत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चकलांबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. चकलांबा पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचलं का? 

 

Back to top button