सिंधुदुर्ग : रस्त्याच्या वादातून बहीण-भावावर कोयत्याने वार | पुढारी

सिंधुदुर्ग : रस्त्याच्या वादातून बहीण-भावावर कोयत्याने वार

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक जागेतून जाणारा रस्ता बंद का केला? याची विचारणा केल्याने भडगाव येथील अजित कृष्णा आंगणे (वय ३१, भडगाव) व त्यांची बहिण रिया शिंदे (रा. मुंबई ) यांच्यावर प्रमोद शांताराम बेलुसे (रा. भडगाव खुर्द तळेवाडी) याने कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात भाऊ व बहीण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कुडाळ तालुक्यातील भडगाव येथे आज (दि. २८) घडली. जखमींवर कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रश्नी परस्पर फिर्याद दाखल होऊन गुन्ह्याची कार्यवाही सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भडगाव येथील जखमी अजित आंगणे यांच्या घरी जाण्यासाठीचा रस्ता आहे. हा रस्ता प्रमोद शांताराम बेलुसे (रा. भडगांव खुर्द तळेवाडी) यांच्या सामाईक जागेतील आहे. दरम्यान प्रमोद बेलुसे हे सकाळी हा रस्ता बंद करत होते. म्हणून अजित आंगणे यांनी तुम्ही रस्ता का बंद करत आहात? असे बेलुसे याला विचारत तेथील आड्याच्या खुंटाला आंगणे यांनी हात लावला. या  बेलुसे याने आपल्या हातातील धारदार कोयत्याने अजित आंगणे यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रसंगावधान राखत आंगणे यांनी बेलुसे याला प्रतिकार केला. मात्र, कोयत्याचे वार आंगणे यांच्या मानेवर लागले. दरम्यान जवळच असलेली आंगणे यांची बहीण रिया शिंदे हिने बेलुसे याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिया यांच्या मनगटावर कोयत्याचा वार बसला.

या हल्यात अजित आंगणे व रिया शिंदे हे दोन्ही भाऊ बहिण रक्तबंबाळ झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या घटनेनंतर जखमी दोघांनाही स्थानिकांनी कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबतची फिर्याद नोंद करून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही कुडाळ पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button