तामसा; पुढारी वृत्तसेवा
जागेच्या वादातून महिलेस जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील वानवाडी गावात उघडकीस आला आहे. लक्ष्मीबाई दत्ता खुपसे ( वय ५५ रा. वानवाडी ) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी हणमंत दिगंबर खुपसे (वय-२७) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
हणमंत आणि लक्ष्मीबाई यांच्यात जागेवरुन वाद हाेता. लक्ष्मीबाई या शुक्रवारी (दि.२७) सकाळी आपल्या शेतात शेळ्या घेऊन चारण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी हणमंत खुपसे आपल्या शेतात मशागतीचे काम करत होता. लक्ष्मीबाई एकट्याच शेतात आल्याचे पाहून त्याने त्यांच्या डोक्यात वार केला. त्या बेशुद् झाल्या. स्वत:च्या शेतात लाकड़ी ढिग असलेल्या ठिकाणी पुरवा नष्ट करण्याच्या हेतुने लक्ष्मीबाई यांना जाळून टाकले.
लक्ष्मीबाई यांचा शाेध घेण्यासाठी त्यांचे पती दत्ता खुपसे वानवाडी येथील जंगलात गेले; पण तिथे त्या आढळल्या नाहीत. त्यांचा मोठा मुलगा लोभाजी खुपसे हा वानवाडी येथील शिवरात गेला. त्याठिकाणी त्याला बांगड्या दिसल्या. आईच्या या बांगड्या असल्याचे त्याच्या लक्षात आले.या घटनेची माहिती त्याने तामसा पोलिसांना दिली.
घटनास्थळी सपोनि अशोक उजगिरे,पोलिस उपनिरक्षक बालाजी किरवले यांनी घटनास्थळी पाहणी केली. लाेभाजी याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी हणमंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी तामसा पोलिस स्टेशनला भेट दिली. हणमंत खुपसे यांच्या विरुद्ध 302,201,भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.