आजची शनैश्वर जयंती आणि सोमवती अमावस्या – जाणून घ्या या विलक्षण योगाबद्दल | पुढारी

आजची शनैश्वर जयंती आणि सोमवती अमावस्या - जाणून घ्या या विलक्षण योगाबद्दल

सोमवार दि. 30 मे रोजी वैशाख अमावास्या आहे. ही तिथी श्री शनैश्वर (shri Shaneeshwar) जयंती म्हणून मानली जाते. नवग्रहात शनि ग्रह हा बलाढ्य मानला जातो. शनि हा न्यायनिष्ठूर ग्रह आहे. अयोग्य मार्गाने जाणार्‍यांवर त्याची वक्रदृष्टी पडते, तर सरळ मार्गाने जाणार्‍यांवर शनि कृपादृष्टी ठेवतो. शनि प्रसन्न झाला, की तो जातकाला वैभवाच्या शिखरावर नेतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

इतर कोणत्याही ग्रहाची जयंती साजरी होत नाही. पण शनि ग्रहाची मात्र जयंती साजरी होते, यातच श्री शनि देवाचे महात्म्य सामावलेले आहे. श्री शनि जयंतीदिनी  श्री शनिला तेल वहावे. उडीद आणि निळी फुले वहावीत. शनिचा जो मंत्र आहे, त्याचे शक्य तेवढे म्हणजे १०८, १००८ असे पठण करावे.

नीलांजनसमाभासं
रविपुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंडसंभूतं
तं नमामी शनैश्चरम ॥
वरील मंत्राचे जमेल तेवढे पठण करावे.

ज्यांना साडेसाती आहे अशांनी म्हणजे ज्यांची रास मकर, कुंभ आणि मीन आहे, त्यांनी श्री शनिला अभिषेक करावा. शनि मंत्राची जपसंख्या 23 हजार आहे. शक्य झाल्यास शनि मंत्राचा जप करून घ्यावा. साडेसाती असणार्‍यांनी शक्य झाल्यास शनिवारी उपवास करावा. शनिला तेल, उडीद, मीठ अर्पण करावे. शनिची पीडा सौम्य होण्यासाठी हा उपाय करावा.

सोमवती अमावास्या

शनि जयंती सोमवती अमावास्येला येत आहे. हा चांगला योग आहे. सोमवती अमावास्येला श्री शंकराचे पूजन अवश्य करावे. या दिवशी श्री महादेवाचे दर्शन घ्यावे. बेल वहावा. तसेच नागकेशर वहावे. शक्य झाल्यास महादेवाला अभिषेक करावा. संसारी जीवनातील अडी-अडचणी, विवंचना श्री शंकर पूजनाने, दर्शनाने सौम्य होऊ शकतात. श्रद्धापूर्वक वरील धार्मिक विधीचे आचरण केल्यास त्याचा निश्चितच लाभ होऊ शकतो.

– पं. अभिजित कश्यप, होरामार्तंड

हेही वाचलंत का ? 

Back to top button