लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील; शरद पवारांच्या भाकिताने राजकारणात नवी चर्चा

शरद पवार
शरद पवार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशात 2024 नंतर विरोधी पक्षांचे राजकारण नवा आकार घेईल. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील आणि काही प्रादेशिक पक्ष तर काँग्रेसमध्ये विलीनदेखील होतील, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्याने राजकारणात एकच चर्चा उठली आहे. लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात असताना शरद पवारांनी हा अंदाज का आणि कशासाठी व्यक्त केला, याचे आडाखे आता बांधले जात आहेत.

'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, येत्या एक-दोन वर्षांत विरोधी पक्षांचे राजकारण नवा आकार घेऊ शकते. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करून राजकारण करणे पसंत करतील आणि काँग्रेसमध्ये विलीन होणे पक्ष हिताचे असेल, तर तसाही निर्णय घेतील. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीलाही हा अंदाज लागू होतो काय, या थेट प्रश्नावर शरद पवार म्हणाले, काँग्रेस आणि आमच्यात तसा कोणताही फरक नाही. विचारांनी आम्ही गांधी-नेहरू विचारसरणीचेच आहोत. राष्ट्रवादी विलीन होण्याबद्दल मी आज काहीच म्हणत नाही. माझ्या सहकार्‍यांशी सल्लामसलत केल्याशिवाय मी असे काही म्हणणे योग्य ठरणार नाही. तत्त्वतः आम्ही काँग्रेसच्या जवळच आहोत. मात्र, भविष्यातील कोणतेही पाऊल आम्ही एकत्र मिळून टाकू. मात्र, भाजप किंवा नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे अत्यंत कठीण आहे.

सातार्‍यात शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेनंतर 4 मे रोजी शरद पवारांनी ही मुलाखत दिली. सप, राजद, वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम, भारत राष्ट्र समिती यासारख्या अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व दुसर्‍या पिढीकडे गेले असून, या पक्षांची वाटचाल एका संक्रमण काळातून होत असताना पवारांनी केलेल्या भाकिताने सर्वार्ंचेच लक्ष वेधून घेतले आहे. भाजपकडून या पक्षांवर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर हल्ले वाढले असल्याने भाजपविरोधी लढाई लढण्यासाठी हे छोटे प्रादेशिक पक्ष एका व्यापक छत्राच्या शोधात असू शकतात. हाच धागा पकडून शरद पवार या मुलाखतीत म्हणतात, राजकीय पक्षांच्या एका मोठ्या गटाला भाजप आणि मोदीही आवडत नाहीत. असे पक्ष आता एकत्र येऊ लागले आहेत. आमच्याप्रमाणेच शिवसेनेचे उद्धव ठाकरेही समविचारी पक्षांसोबत काम करण्यास तयार आहेत. या दिशेने त्यांचे विचार करणे मी जवळून पाहिले आहे.

महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांच्या विरोधात एक जबरदस्त प्रवाह जाणवतो. हाच प्रवाह अगदी उत्तर प्रदेशप्रमाणेच देशाच्या अनेक भागांमध्येही आहे. देश का मूड मोदी के खिलाफ हो रहा हैं आणि आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांचे बोट धरून एका अनुकूल दिशेने वळतो आहोत. 2019 आणि 2024 मध्ये आणखी एक फरक आहे. तो म्हणजे तरुण पिढी मागच्या वेळेपेक्षा आज विरोधी पक्षांच्या बाजूने अधिक उभी राहताना दिसते.

1977 ची पुनरावृृत्ती?

1977 ला निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता पक्ष स्थापन झाला आणि नंतर विविध पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केले. तेव्हाच्या जनता पक्षासारखीच परिस्थिती आज निर्माण होऊ शकते, असे भाकीतही शरद पवारांनी वर्तवले. पवार पुढे म्हणाले, तेव्हाही विरोधकांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. नंतर मोरारजी देसाईंची निवड पंतप्रधान म्हणून झाली. मोरारजी देसाईंना 1977 मध्ये जेवढी राजकीय मान्यता होती, त्यापेक्षा राहुल गांधींना आज असलेली राजकीय मान्यता अधिक आहे. त्यांना खुद्द काँग्र्रेसमधूनही चांगला पाठिंबा आहे. शिवाय, आम्हा सर्व नेत्यांशी राहुल गांधींनी सातत्याने एक संवाद प्रस्थापित केला आहे. समविचारी मंडळींना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहुल गांधी करतात. असे कामदेखील मोरारजी देसाईदेखील करत नव्हते. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, एकत्र येऊन काम केले पाहिजे, असा विचार विरोधी पक्षांमध्ये प्रबळ झाला असून, आजच्या परिस्थितीचीही तीच मागणी आहे. आम्ही निवडून आलो तर आम्ही स्थिर सरकार दिले पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार मोठे नेते आहेत. खरे म्हणजे 'उबाठा'चीही काँग्रेस आधीच झाली आहे. ते काँग्रेसची, पाकिस्तानची बोली बोलू लागले आहेत. तिकडे फारूख अब्दुल्लाही तशीच भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आता फक्त विलीनीकरणाची औपचारिकता तेवढी बाकी आहे.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीतील पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करावा. त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news