मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर; कोल्हापुरात 71.59, तर हातकणंगलेत 71.11 टक्के मतदान | पुढारी

मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर; कोल्हापुरात 71.59, तर हातकणंगलेत 71.11 टक्के मतदान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत गत निवडणुकीच्या तुलनेत मताचा टक्का वाढला. कोल्हापुरात 71.59, तर हातकणंगलेत 71.11 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी 71.35 टक्के मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघांत अनुक्रमे 0.89 आणि 0.83 टक्क्याने मतदानात वाढ झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतदानाची अंतिम आकडेवारी बुधवारी जाहीर केली.

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत प्रचाराचा धडाका उडाला होता. आरोप-प्रत्यारोपाने गटा-गटांतील ईर्ष्या वाढली, त्यातून मंगळवारी चुरशीने मतदान झाले. गतवेळच्या (2019) लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत यावेळी वाढ होईल, अशी शक्यता होती. ती खरी ठरली. गतवेळी कोल्हापूर मतदारसंघात 70.70 टक्के, तर हातकणंगलेत 70.28 टक्के मतदान झाले होते. यावेळी दोन्ही मतदारसंघांतील मतदानाचा टक्का वाढला.

कोल्हापूर मतदारसंघातील 19 लाख 36 हजार 403 मतदारांपैकी 13 लाख 86 हजार 230 जणांनी मतदान केले. यामध्ये 7 लाख 24 हजार 734 पुरुष, 6 लाख 61 हजार 457 महिला, तर 39 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. हातकणंगले मतदारसंघातील 18 लाख 14 हजार 453 मतदारांपैकी 12 लाख 90 हजार 73 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 6 लाख 78 हजार 590 पुरुष, 6 लाख 11 हजार 453 महिला, तर 30 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

Back to top button