वडिलांच्या निधनानंतर १२ वर्षांनी उघडले लॉकर, मिळाले तीन कोटी; सर्व नोटा कालबाह्य | पुढारी

वडिलांच्या निधनानंतर १२ वर्षांनी उघडले लॉकर, मिळाले तीन कोटी; सर्व नोटा कालबाह्य

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : दैव देते आणि कर्म नेते, असा काहीसा प्रकार बार्देश तालुक्यात घडला. मुलांच्या भवितव्यासाठी आई-वडिलांनी कष्ट करून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले तब्बल तीन कोटी रुपये सापडले खरे; मात्र नोटाबंदीमुळे कालबाह्य झालेल्या या नोटांचा कोणताही फायदा त्यांच्या मुलांना झाला नाही.

वडिलांचे निधन झाल्यानंतर 12 वर्षांनी त्या गृहस्थाची मुले परदेशातून गोव्यात आली. गोव्यातील मालमत्ता विकून परदेशीच स्थायिक होण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यामुळे वडिलोपार्जित घराच्या पडताळणीवेळी या मुलांना बँकेची कागदपत्रे व लॉकरच्या चाव्या सापडल्या. मुलांनी संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. लॉकर उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची सर्व पूर्तता झाल्यानंतर बँक अधिकार्‍यांनी लॉकरधारकाच्या वारसदारांना उघडण्यास परवानगी दिली. एका तपानंतर उघडण्यात आलेल्या या तिन्ही लॉकर्समधील पैशांची बंडले आणि किमती दागिने पाहून मुलांसह बँक अधिकारीही चक्रावून गेले.

लॉकरमधील रकमेची मुलांना कल्पनाच नव्हती

आई-वडिलांनी एवढी मोठी रक्कम आपल्यासाठी मागे ठेवल्याची कोणतीही कल्पना त्यांच्या मुलांना नव्हती. मुलांनी लॉकरमध्ये नोटांची बंडले पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यांना आधी माहिती असते, तर सरकारने 2019 मध्ये जेव्हा नोटाबंदी लागू केली तेव्हाच मुलांना ही रक्कम नोटा बदलून कायदेशीर करून घेता आली असती. सद्यस्थितीत काहीही करणे शक्य नसल्याने कालबाह्य नोटा बँकेच्या स्वाधीन करण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही राहिले नाही.

Back to top button