World Mental Health Day : तुम्‍हाला ‘क्लिनिकल डिप्रेशन’ आहे का? जाणून घ्या लक्षणे | पुढारी

World Mental Health Day : तुम्‍हाला 'क्लिनिकल डिप्रेशन' आहे का? जाणून घ्या लक्षणे

सोनाली जाधव

‘टेन्शन नहीं लेने का बाबा…’  हा फिल्‍मी डायलाॅग पडद्यावर पाहायला आणि ऐकायला बरं वाटतं. वास्तवात कितीही म्हटलं तरी टेन्शन हे येतंच. सुखाच्या पाठीमागे धावणाऱ्या माणसाला जगत असताना अनेक चढ-उतार येतात. जगताना जस शारीरिक आरोग्याला प्राधान्य देतो तसेच आपण मानसिक आरोग्याला प्राधान्य देतो का? बऱ्याचवेळा लोक याचं उत्तर नाही असं देतील; पण शारीरिक आरोग्यप्रमाणे मानसिक आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे. मानसिक आरोग्याविषयी जनसामान्यामध्ये जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने जागतिक मानसिक आरोग्य दिन. (World Mental Health Day) दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.  त्या निमित्ताने आपण क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे काय? त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार याबाबत जाणून घेऊया.

संबधित बातम्या

माणसाला आयुष्यातून काय हवे असते? उदा. घर, कुटुंब, व्यवसाय आदी. व्यक्तिपरत्वे या गोष्टी बदलत राहतात; पण आयुष्य जगत असताना बरेच चढ-उतार येत असतात, कठीण प्रसंग येत राहतात. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, मग हळूहळू नैराश्य येतं. काहीजण या नैराश्यातून बाहेर पडतात तर काहीजण या नैराश्यात गुंतत जातात. आणि या नैराश्याचा बळी ठरतात. (World Mental Health Day)

World Mental Health Day : क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे काय?

भारतासारख्या आपल्या विकसनशील देशात नैराश्य ही एक सामान्य समस्या आहे. अलीकडच्या काही वर्षात डिप्रेशनच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपल्या लक्षात येईल. याची अनेक कारणे असू शकतात, ती व्यक्तीसापेक्ष असतात. जर का नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला योग्यवेळी सकारात्मक उपचार नाही मिळाले, तर त्या व्यक्तीचा एकटेपणा वाढत जातो. त्याला सौम्य झटके देखील येऊ शकतात. अनेकवेळा मर्यादा ओलांडून जीवन संपविण्‍याबाबतचा टाेकाचा विचारही मनात येण्‍यापर्यंत त्या व्यक्तीचे नैराश्य पोहोचते. त्यावेळी डॉक्टर नैराश्याच्या या समस्येला क्लिनिकल डिप्रेशन, मेजर डिप्रेशन किंवा मेजर डिप्रेशन डिसऑर्डर (MDD) म्हणतात.क्लिनिकल डिप्रेशन हा मानसिक आजाराचा गंभीर प्रकार आहे. जो नैराश्याचा पुढील टप्पा असतो. या समस्येमध्ये नैराश्याच्या भावनांप्रमाणेच शारीरिक विकृतीचा देखील समावेश असतो. उदा. झोप न लागणे, भूक न लागणे इ. आहेत

नैराश्य आणि क्लिनिकल डिप्रेशनमधील फरक

नैराश्य आणि क्लिनिकल नैराश्य हे मुळात एकाच समस्येचे दोन टप्पे आहेत. नैराश्याच्या समस्येवर वेळेवर उपचार न केल्यास त्याचे क्लिनिकल डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकते. अनुवांशिक कारणेही यासाठी कारणीभूत ठरत असतात. एखाद्या बाबतीत काही क्षण दु : खी वाटणे ही एक मानवी भावना आहे; पण दुःखी असण्याव्यतिरिक्त इतर अनेक चिन्हे आणि लक्षणे असतात. ज्याच्या आधारावर रुग्‍णाला केवळ नैराश्य आहे की क्लीनिकल डिप्रेशन याची खात्री केली जाते. क्लिनिकल डिप्रेशन हा एक गंभीर आजार आहे. त्याची लक्षणे जेवढ्या लवकर समजून घेता येईल, तेवढ्या लवकर ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून योग्य उपचार मिळू शकतील. आणि ती व्यक्ती यातून लवकर बाहेर पडू शकते.

World Mental Health Day : क्लिनिकल डिप्रेशनची कारणे

क्लिनिकल डिप्रेशनची कारणे व्यक्तिपरत्वे बदलत राहतात. उदा. आपल्या शरीरातील संप्रेरक यांचे असंतुलन, अनुवांशिकरित्या ही कारण ठरू शकते. काही अभ्यासकांच्या मते जर तुमचे पालक क्लिनिकल डिप्रेशन असलेले असतील तर तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता दोन ते तीन पटीने जास्त असते. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचं वातावरण. उदा. एखाद्या व्यक्तीने बालपणात सहन केलेला हिंसाचार, गैरवर्तन दुर्लक्षित झालेला असेल. गरिबी, वंचित जीवन जगणाऱ्या व्यक्तीला क्लिनिकल डिप्रेशन होण्याची शक्यताही जास्त असते. त्याचबरोबर एखादी व्यक्ती उदास किंवा दुःखी होईल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही. किंवा ते केव्हा होईल? परंतु असे अनेक जबाबदार घटक आहेत ज्यामुळे नैराश्याची शक्यता वाढू शकते. उदा. व्यसन, ज्याच्या कुटुंबातील सदस्याने जीवन संपवणे, जीवनात अचानक लक्षणीय बदल, एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू, खूप ताण येणे, काही प्रकारचे अचानक आघात अनुभवल्यानंतर, काही वैद्यकीय परिस्थितींमुळे, जसे की मेंदूच्या गाठी, अत्यंत निराशावादी असणे आदी बाबींमुळेही क्लिनिकल डिप्रेशन येऊ शकते.

क्लिनिकल डिप्रेशनची शारीरिक लक्षणे

एखादी व्यक्ती क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहे कसं ओळखायचं? त्याची काही सामान्य लक्षणे आहेत. क्लिनिकल नैराश्याची लक्षणे, वैशिष्ट्ये अत्यंत सौम्य ते गंभीर असू शकतात. या लक्षणांमध्ये सतत उदासीन वाटणे, एखाद्या घटनेबाबतीत तीव्र दुःख वाटणे, निराशेची भावना असणे, छंद, आवडी-निवडी मध्ये रस न वाटणे, सतत थकवा जाणवणे, निद्रानाश, भूक न लागणे आणि त्यानंतर वजन कमी होणे, जास्त खाणे, परिणामी वजन वाढत राहते, हळू चालणे किंवा हळू बोलणे, हाताच्या विचित्र हालचाली, स्वतःबद्दल सतत दोषी वाटणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, निर्णय घेण्यात अडचण, जीवन संपवण्याचा विचार येणे आदी लक्षणांचा समावेश होतो. जेव्हा ही लक्षणे किमान दोन आठवडे असतात तेव्हा क्लिनिकल नैराश्याची समस्या आहे असं म्हणू शकतो. इतर अनेक शारीरिक लक्षणे देखील क्लिनिकल नैराश्याच्या लक्षणे असू शकतात. उदा.थायरॉईड समस्या, ब्रेन ट्यूमर, व्हिटॅमिनची कमतरता इत्यादी.

क्लिनिकल डिप्रेशनचे निदान आणि उपचार

क्लिनिकल डिप्रेशनचे निदान हे त्या व्यक्तीची शारीरिक तपासणी, मानसोपचारतज्ज्ञ किंवा इतर मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून केले जाते. या काळात तुमच्या मेंदूची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ अनेक प्रकारच्या चाचण्या करू शकतात. उदा, सध्याच्या लक्षणांचा इतिहास आणि तुमचे विचार, भावना आणि वर्तन यांचे मूल्यांकन केले जाते, काही प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात देण्यास सांगितले जाऊ शकतात. कौटुंबिक इतिहास समजावून घेतला जातो.

World Mental Health Day : क्लिनिकल डिप्रेशन बरा हाेणारा आजार …

क्लिनिकल डिप्रेशन ही एक प्रकारची मानसिक समस्या आहे. परंतु असे असूनही, हा बरा होणारा आजार आहे. क्लिनिकल डिप्रेशन ग्रस्त लोक योग्य उपचाराने बरे होऊ शकतात; परंतु त्याचे उपचार काही आठवडे ते महिने असू शकतात.

क्लिनिकल डिप्रेशन आणि मानसोपचार

‘टॉक थेरपी’ ही थेरपी सामान्यतः सौम्य प्रकारच्या नैराश्याच्या रुग्णांसाठी वापरली जाते. परंतु मध्यम ते, गंभीर नैराश्य असल्यास, औषधांसह टॉक थेरपी घेण्यास सांगितले जाऊ शकते. यामध्ये मानसोपचार तज्ञ तुमच्याशी विविध प्रकारे संवाद साधून रुग्णाला बोलके करत असतो. त्याच्या सकारात्मक विचारांना चालना देऊन, त्याला समजून घेऊन उपचार करत असतो. याचबरोबर नैराश्यासाठी सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक म्हणजे संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी किंवा CBT. हाही एक प्रकारचा मानसशास्त्रीय उपचार आहे.

शारीरिक आजारांप्रमाणे ‘या’ समस्येवरही उपचार घेणं गरजेचं

मानसोपचार तज्ञ शाल्मली रानमळे सांगतात, ” नैराश्याची तीव्रता अधिक जेव्हा असते, तेव्हा ते क्लिनिकल डिप्रेशन म्हणू शकतो. यासह इतर लक्षणं किमान १५ दिवस असतात. यावर जर योग्य उपचार घेतले तर यातून व्यक्ती पूर्णतः बरे होऊ शकतो. जसं आपण शारीरिक आजारांवर उपचार घेतो तसं या समस्येवरही उपचार घेणं गरजेचं आहे. या समस्येवर मुक्तपणे बोलणं गरजेचं आहे.” या समस्येच्या युथमधील कारणांबाबत बोलत असताना त्या सांगतात, ” मी सर्वात टॉप आलो पाहिजे, प्रेशर, स्पर्धा त्याचबरोबर अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढलेला सोशल मीडियाचा वापर, त्यावरील लाईक्स हेही क्लिनिकल डिप्रेशन येण्यास कारणीभूत ठरत आहे.”

World Mental Health Day : व्यक्त व्हा…!

तुम्हाला क्लिनिकल डिप्रेशन लक्षणे आढळल्यास, तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा, डॉक्टरांशी बोला. पुढील उपचारासाठी मानसिक आरोग्य तज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञांशी बोला. विचारण्यास आणि सांगण्यास घाबरू नका. तुमच्या मानसिक आरोग्याबाबत उपचार होण्याच्या दिशेने ही पहिली पायरी आहे.

World Mental Health Day : क्लिनिकल डिप्रेशनमुळे सुरू केलं,”या बोलू या…”

सध्या कंटेंट क्रियटर असलेले सचिन सांगतात,” मी ही नैराश्यात होतो. २०११ ते २०१५ तब्बल चार वर्षे माझ्यासाठी असून, नसल्यासारखी गेली. भविष्याची चिंता, आर्थिक अस्थैर्य, कौटुंबिक समस्या, प्रेमभंग, शैक्षणिक अपयश अशा अनेक समस्यांचा गुंता झाला होता. कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हतं. अनावश्यक विचारांचे काहूर माजायचे. मनात मृत्यूचे विचार यायचे. पण मी काय लगेच टोकाचे पाऊल उचलले नाही. माझ्यात झालेला बदल मला लक्षात येत गेला. मित्रांनी ही डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले. मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांच्याकडे उपचार आणि समुपदेशन घेतले. स्वत:ला सकारात्मक कामांत गुंतवून ठेवले. या काळात जवळच्या नातेवाईकांनी मला समजून घेतले. हळूहळू या सगळ्यातून बाहेर पडलो. सुशांतसिंग रजपूतच्या आत्महत्येनंतर याबद्दल जाहीरपणे समाजमाध्यमातून व्यक्त झालो. त्यांनंतर अनेकांनी संपर्क साधून त्यांना होणा-या त्रासाबद्दल सांगितले. आता जसं जमेल, तसं नैराश्यात असलेल्या लोकांशी बोलतो आणि मानसोपचार, समुपदेशन घेण्यास सांगतो.

नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप या त्रिसुत्रीचा अवलंब करत , विविध छंद जोपासत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दररोज नव्या उमेदीने एक एक पाऊल पुढे टाकल्यास नैराश्यातून कायमचे बाहेर येता येतं. “या बोलू या.” हा उपक्रम त्यांनी समाजमाध्यमातून सुरू केला आहे.

…आणि मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करतोय

सामाजिक क्षेत्रात काम करणारा सूरज सांगतो,”१२ वी मध्ये असताना डिप्रेशनची समस्या सुरू झाली. आई-बाबांशी बोलून मी उपचार घ्यायचं ठरवलं. प्रेशर, परीक्षेचं ओझं हे कारण. पण मी माझ्या या समस्येबद्दल माझे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींशी मुक्तपणे बोललो आहे. त्यांच्या मदतीने मी यातून बाहेर पडलो. २०१४ ते २०२० या दरम्यान विविध ट्रीटमेंट झाल्या. पण मला वाटतं विपश्यना आणि विचार करण्याच्या पद्धतीने मी यावर मात केली. आता मी यातून पूर्णपणे बाहेर पडलो आहे, आता माझी स्वप्नं पूर्ण करत आहे, मी माझ्या आवडीच्या गोष्टी करत आहे.”

हेही वाचा:

Back to top button