Mental Health Day : मानसिक आरोग्य का बिघडते? जाणून घ्‍या कारणे आणि उपाय | पुढारी

Mental Health Day : मानसिक आरोग्य का बिघडते? जाणून घ्‍या कारणे आणि उपाय

प्रा. व्‍ही. बी. अडसरे, ( मानसशास्‍त्र विभागप्रमुख, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर)

जागतिक मानसिक आरोग्य दिन ( World Mental Health Day ) हा दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी सर्व जगभर साजरा केला जातो. मानसिक आरोग्याविषयी जनसामान्यामध्ये जागरुकता निर्माण व्हावी तसेच मानसिक आरोग्याबाबत धोरणात्मक सुधारणा व्हावी या अनुषंगाने जागतिक मानसिक आरोग्य दिन सर्व जगभर साजरा केला जातो. आपण आपल्या शारीरिक आरोग्याची बरीच काळजी घेतो. सकाळी उठल्यावर नैसर्गिक क्रिया उरकणे, अंघोळ करणे, चांगला आहार घेणे, व्यायाम करणे, आजारी असल्यास दवाखान्यात जाणे; पण त्या मानाने आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा कधी विचार करत नाही. आपल्यापैकी काहींना रात्री झोप येत नाही, अकारण भीती वाटते, काहींच्या लक्षात राहत नाही व काही व्यक्तींच्या मनात जीवन संपविण्‍याचे विचार येतात ही सर्व मानसिक स्वास्थ्य नसल्याची लक्षणे आहेत. सर्वसामान्य व्यक्ती शारीरिक आरोग्याविषयी खूप जागरूक असते; परंतु मानसिक आरोग्याविषयी व्यक्ती जागरूक नसते कारण मानसिक आरोग्य नेमके कशाला म्हणायचे याबाबत समाजातील व्यक्तीच्या मनामध्ये अनेक गैरसमज आजही दिसून येतात. म्हणून मानसिक आरोग्य नेमके कशाला म्हणायचे याबाबत आपण जाणून घेवूया..

Mental Health Day : मानसिक आरोग्य म्हणजे काय?

शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्ति जीवनातील आनंद व्यवस्थितपणे उपभोगू शकतात. या दोहोंत शारीरिक आरोग्याकडे आपले जाणीवपूर्वक लक्ष असते. शारीरिक व्याधीची किंवा शरीराच्या बिघाडाची आपल्याला चटकन जाणीव होते. उदा. डोके दुखणे, पोट दुखणे, सर्दी होणे व ताप येणे यासारख्या व्याधी झाल्या की, आपण त्वरित डॉक्टरकडे जातो व औषधोपचार करून घेतो. व्यक्तिचे शारीरिक आरोग्य जसे बिघडते तसेच मानसिक आरोग्यही बिघडते; पण त्याची जाणीव आपणास प्रकर्षाने होत नाही. जाणीव झाली तरी मानसिक अस्वास्थ्याकडे आपण पुष्कळवेळा दुर्लक्ष करतो. प्रत्येक व्यक्तिने स्वतः मनाने निरोगी राहण्याचा केलेला प्रयत्न हा त्या व्यक्तिच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या हितासाठी महत्त्वाचा आहे. मानसिक आरोग्य ही व्यापक कल्पना आहे. मानसिक आरोग्य म्हणजे अखंड व्यक्तिमत्त्वाचा सुसंवादी आविष्कार होय. हा सुसंवाद इतर व्यक्तिशी बाह्य परिस्थितीशी आणि माणसाच्या वृत्तीशी असतो. मानसिक आरोग्यामध्ये समायोजन साधण्याला महत्त्वाचे स्थान आहे. मानसिक आरोग्य सापेक्ष असते ते वेगवेगळ्या व्यक्तित वेगवेगळ्या प्रमाणात असते. मानसिक आरोग्याची गुणवत्ताही प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न-भिन्न असते.

मानसिक आरोग्य निकोप आहे असे केव्हा म्हणतो?

एखाद्या व्‍यक्‍तीचे मानसिक आरोग्य निकोप आहे असे आपण केव्हा म्हणतो याचा विचार करावयास हवा. मानसिक आरोग्य लाभले आहे ती व्यक्ति आनंदी असते. इतरांना उपद्रव न देता आनंदाने आपले जीवन व्यतीत करते. मानसिक आरोग्य लाभलेली व्यक्‍ती परिस्थितीशी तडजोड करते व मिळतेजुळते घेते. अशा व्यक्तिच्या मनावर ताण असत नाही. मानसिक द्वंद असत नाही. मानसिक आरोग्य संपन्न असलेली व्यक्ति शारीरिकदृष्ट्याही निरोगी असते. वागण्यात सहजता, सामंजस्य व मोकळेपणा असतो. अशी व्यक्‍ती सर्वांना हवीहवीशी वाटते.

मानसिक आरोग्य चांगले असणारी व्‍यक्‍ती विचारी असते. ती भावनेच्या आहारी जात नाही. सतत स्वप्नात रंगून जाणे तिला अमान्य असते. भरपूर प्रमाणात आत्मविश्वास असतो. स्वतःच्या ध्येयांची व आशा-आकांक्षाची तिला जाणीव असते. आशावाद हा अशा तिच्या जीवनाचा मूलाधार असतो. उत्साही प्रयत्नवादी, उपक्रमशील, कर्तव्यदक्ष व समाजाभिमुखी असतात. अशा व्‍यक्‍ती इतरांच्या भावना जाणून घेतात. प्रेमाने वागतात. अशा व्यक्तींच्या जीवनात वैफल्‍याला थारा नसतो. त्‍यांना अहंकाराचा वारा लागत नाही. सुखाने हुरळून जात नाहीत व दुःखाने खचत नाहीत, मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्ती सतत प्रयत्नशील असतात आणि परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून
पाहतात. मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्तींना जीवनदृष्टी लाभलेली असते..

Mental Health Day : मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणे

मनाची दुर्बलता काही व्यक्तीचे शरीर फारच दुर्बल असते म्हणजेच त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे हवा पाण्यातील थोडासा बदलही त्यांना सहन होत नाही. त्याचप्रमाणे काही व्यक्तीचे मन फारच कमकुमत असते. त्यामुळे क्षुल्लक गोष्टीचा, इतरांना होणाऱ्या दुःखाचा त्रास त्यांना होतो. काही व्यक्ती संशयी असतात. त्‍यांना असे वाटते की, सभोवतालच्या व्यक्ती आपल्या विरुद्ध आहेत असा गैरसमज करून घेतात. त्यामुळे अशा व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडते.

भूक, तहान, झोप व लैंगिक प्रेरणा या प्रमुख शारीरिक गरजा आहेत. मानसिक गरजा म्हणजे भावनात्मक सुरक्षितता लाभणे, यशप्राप्ती होणे, वर्चस्व प्रस्थापित होणे, प्रतिष्ठा व मान्यता मिळणे इ. गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर व्यक्तीच्या मनामध्ये संघर्ष निर्माण होतो व मानसिक स्वास्थ बिघडते.

मानसिक संघर्ष- मानसिक संघर्ष हे मानसिक आरोग्य बिघडण्याचे महत्त्वाचे कारण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेकवेळा मानसिक संघर्ष निर्माण होतात. अशावेळी व्यक्ती जर मानसिक संघर्षाना व्यवस्थित तोंड देऊ शकली नाही तर तिचे मानसिक आरोग्य धोक्यात येते.
वैफल्य- व्यक्तीची इच्छा /ध्येयपूर्ती न झाल्यास मनाची जी स्थिती होते ती म्हणजे वैफल्य होय. उदा. डॉक्टर / इंजिनिअर होण्याची इच्छा असते; पण संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. अशा वेळी मनोरथ ढासळते व वैफल्याचे साम्राज्य सुरू होते. भविष्यकाळ अंधःकारमय झालेला दिसतो. यातूनच वैफल्याची भावना पराकोटीला पोहचते आणि जीवन संपविण्‍यापर्यंत टोकाची भूमिका घेतली जाते.

Mental Health Day : मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक

अनुवंशिक घटक – गुणसूत्रे ज्याप्रमाणे काही गुणधर्म संक्रमित करतात त्याचप्रमाणे विकृतीही संक्रमित करतात. उदा. मानसिक दौर्बल्य, मज्जाविकृती, शारीरिक ठेवण इ. शरीर रचनेमध्ये आनुवंशिक गुणांमुळे काही उणीव निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी व्यक्तीस अनावश्यक ताण सहन करावा लागतो व हा ताण व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतो.

शारीरिक घटक- “sound mind in a sound body” या उक्तीनुसार ज्याची शरीर प्रकृती उत्तम असते. त्याचे मानसिक आरोग्यही उत्तमच असते. मानसिक आरोग्य ठीक नसल्यास व्यक्तीस दैनंदिन कार्ये करण्यास अडचणी येतात. त्यातूनच न्यूनगंड निर्माण होतो आणि मानसिक संघर्ष वाढतो. व्यक्तीची समायोजनक्षमता कोलमडते व त्यातूनच व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडते.

परिस्थितीजन्य घटक- अनुवंश व शारीरिक घटकाप्रमाणेच कुटुंब, शाळा, मित्र व समाज या वातावरणाचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर चांगला व वाईट परिणाम होत असतो. सामाजिक व भावनिक विषमायोजन हे मानसिक आरोग्य बिघडण्यास जबाबदार असते.

मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्‍यासाठी कोणत्‍या उपाययोजना कराव्‍यात

साधारणपणे सर्व व्यक्ती मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञाकडे धाव घेतात. परंतु ‘मानसिक आरोग्य खालावणार नाही याची काळजी आगोदरच घेणे म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय होय’ असा याचा अर्थ होतो. त्यामुळे खालील बाबींचा विचार करून व्यक्तीने आपले मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यास मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवता येईल.

  • वास्तवाचा विचार करणे
  • आवश्यक कौशल्ये संपादित करणे
  • आवश्यकतेनुसार प्रेरणा व ध्येयात बदल करणे.
  •  भावनांचा स्वीकार करणे.
  • भावना व्यक्त करणे.
  •  स्वतःबद्दल व परिसराबद्दल संवेदनक्षम बनने.
  • संघर्ष व वैफल्य कमी करणे.
  •  उपयुक्त काम करणे.
  • छंद जोपासणे.
  • आरोग्य सांभाळणे.
  • परिस्थितीमध्ये सुधारणा करणे- समताग्रह, तडजोड व माघार यांचा अवलंब करणे.
  • जीवनशैलीत बदल करणे- व्यायाम, तणावाबद्दल सहनशीलता, पोषक आहार, असुखकारक विचारावर नियंत्रण व वजन नियंत्रण इ.

 

Back to top button