

पुणे : मुलांमधील चिडचिड, एकलकोंडेपणा, टोकाचे पाऊल उचलण्याची प्रवृत्ती पालकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. शालेय आणि किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. यावरील उपाय म्हणून, पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलावे, भावविश्व जाणून घ्यावे आणि मैत्रीचे नाते निर्माण करावे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. यानिमित्ताने यावर्षी केलेल्या पाहणीत, भारतात 23.3 टक्के मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या आढळून आल्या. विशेषत: कोरोना काळानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष आहे.
कोरोना काळात घरी बसून राहिल्यामुळे मोबाईलमधील वेगवान गेम खेळणे, रिल्स आणि शॉर्ट पाहणे, अशा गोष्टी मुलांच्या चंचलतेत वाढ होण्यास कारणीभूत ठरल्या. त्याचा परिणाम अभ्यासासह वागणुकीवर, स्वभावावर होत आहे. ही धोक्याची घंटा ओळखून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आवश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आठवड्यातील एक दिवस 'नो मोबाईल डे' म्हणून पाळला जावा.
मुलांना सुट्टीच्या दिवशी शहरातील पर्यटनस्थळे, वाचनालये इत्यादी ठिकाणी घेऊन जावे.
मुलांना त्यांची चूक शांतपणे समजावून सांगावी. सुसंवाद वाढवावा.
मुलांची इतरांशी सतत तुलना करण्याऐवजी त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचे कौतुक करावे, चुका सुधारण्यास मदत करावी.
स्क्रीन टाईमचे तोटे समजावून सांगावे
मुलांमधील मानसिक आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण होत आहे. पालक आणि मुलांमध्ये विसंवादाची दरी वाढत आहे. अशा परिस्थितीत मुलांवर चिडचिड करण्याऐवजी त्यांना समजून घेणे आणि समजावून सांगणे गरजेचे आहे. मुले पालकांचे अनुकरण करत असल्याने मुलांना केवळ सल्ले देण्याऐवजी आपल्या वागण्यात काय सुधारणा करता येईल, याचा पालकांनी विचार करावा. मुलांमध्ये मानसिक समस्या आढळून आल्यास समुपदेशकांचा सल्ला घेण्यास संकोच मानू नये.
– डॉ. वसंत रानडे, मानसोपचारतज्ज्ञ
हेही वाचा