नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली करून गंडा | पुढारी

नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली करून गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीकडील एटीएम कार्डची अदलाबदली करून भामट्यांनी तिच्या बँक खात्यातून १९ हजार रुपये काढून घेत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनाली प्रमोद दोंदे (रा. जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या मंगळवारी (दि.१०) सकाळी बोधलेनगर येथील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या. भामटे तेथेच घुटमळत होते. भामट्यांनी मनाली यांना मदत करण्याच्या बहाण्याने मनाली यांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड जाणून घेतला. त्यानंतर भामट्यांनी एटीएम कार्डची अदलाबदली करून त्या कार्डचा वापर करून बँक खात्यातून १९ हजार रुपये परस्पर काढून घेत गंडा घातला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, भामट्यांचा शोध सुरू केला आहे. एटीएम केंद्रातील सीसीटीव्हीच्या आधारे भामट्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेतला जात आहे.

चाेरट्यांची हीच माेडस ऑपरेंडी आहे. ते तक्रारदाराला हेरून घेतात. त्यामुळे कुटुंबातील माहितगाराला साेबत न्यावे. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आहे. त्यातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. टाेळीचा शाेध घेतला जात आहे. – सुनील राेहाेकले, वरिष्ठ निरीक्षक, मुंबई नाका पाे. ठाणे.

हेही वाचा:

Back to top button