पिंपरी : ‘मुळा नदी सुधार’साठी खासगी जागा ताब्यात घेणार | पुढारी

पिंपरी : ‘मुळा नदी सुधार’साठी खासगी जागा ताब्यात घेणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. शहराकडील नदीच्या एका बाजूचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी वाकड, पिंपळे निलख व सांगवी येथील नदी काठच्या निळ्या पूर रेषेतील व निळ्या पूररेषेबाहेरील खासगी जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी जमीनमालकांना नुकसान भरपाई देण्यासाठी अंदाजे 175 कोटी खर्च अपेक्षित आहे.

त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.10) झालेल्या बैठकीत सर्वसाधारण सभेची मंजुरी दिली. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका संयुक्तपणे मुळा नदी सुधार प्रकल्प राबवित आहे. प्रकल्पाचा सल्लागार एकच असला तरी, दोन्ही पालिकेने स्वतंत्र निविदाप्रक्रिया राबविली आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेने वाकड बायपास ते बोपखेल या 14.20 किलोमीटरपैकी वाकड ते सांगवी पुलापर्यंत असे 8.80 किलोमीटर अंतराच्या एका बाजूच्या कामासाठी 321 कोटी खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे.

या प्रकल्पाच्या आराखड्यात निश्चित करण्यात आलेली नदीकाठची खासगी जागा भूसंपादीत करण्यात येणार आहे. त्यात वाकड, पिंपळे निलख व सांगवी या भागात निळ्या पूर रेषेतील व निळ्या पूर रेषेबाहेरील जागा आहे.

त्या खासगी जागा भूसंपादन करण्यासाठी अंदाजे 175 कोटी नुकसान भरपाई जमीनमालकांना द्यावी लागणार आहे. हे भूसंपादन नगररचना व विकास विभागाकडून केले जाणार आहे. त्यासाठी येणार्‍या प्रत्यक्ष खर्चास आयुक्तांनी आज झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. या भूसंपादनासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची मान्यताही घेण्यात येणार आहे. भूसंपादन केल्यानंतर प्रकल्पाचे काम करणे सुलभ होणार आहे, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button