Border Gavaskar Trophy : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर! जखमी ग्रीन-स्टार्कचाही संघात समावेश | पुढारी

Border Gavaskar Trophy : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर! जखमी ग्रीन-स्टार्कचाही संघात समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाने बुधवारी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात चार फिरकी गोलंदाजांची निवड करण्यात आली असून 22 वर्षीय टॉड मर्फीला संधी देण्यात आली आहे. तसेच मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन हेही संघाचा भाग आहेत. हे दोन्ही खेळाडू सध्या दुखापतीशी झुंजत आहेत. स्टार्क आणि कमिन्स वेळेत तंदुरुस्त होतील अशी आशा ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाला आहे.

झाम्पा ऐवजी मर्फीला प्राधान्य

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यास अजून एक महिना बाकी आहे. पण त्याआधीच कांगारू संघाने आपल्या संघाची घोषणा केली. यात टॉड मर्फी, ॲश्टन अगर, मिचेल स्वेपसन आणि नॅथन लायन या चार फिरकीपटूंचा समावेश केला आहे. ऑफस्पिनर टॉड मर्फीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजांना नाचवले आहे. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून निवडकर्ते प्रभावित झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन निवड समितीने ॲडम झाम्पा ऐवजी मर्फीला प्राधान्य देणे योग्य मानले आणि 18 सदस्यीय संघात त्याला स्थान दिले. (Border Gavaskar Trophy)

ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी मर्फीच्या निवडीचे समर्थन केले. ते म्हणाले की मर्फीने शेफिल्ड शिल्डमधील कामगिरीने प्रभावित केले. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलिया अ आणि प्रेसिंडेंट इलेव्हन संघासाठीही चांगली कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करून मर्फी हा एक मजबूत फिरकी पर्याय म्हणून उदयास आला आहे,’ असे स्पष्ट केले आहे. (Border Gavaskar Trophy)

मिचेल स्टार्क पहिल्या कसोटीतून बाहेर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यादरम्यान मिचेल स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो त्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला होता. आता तो 9 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. मात्र, दिल्ली कसोटीपूर्वी तो संघात सामील होईल, असे ऑस्ट्रेलियन निवड समितीने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे बोटाच्या दुखपतीनेग्रस्त अष्टपैलू कॅमेरून ग्रीन पहिल्या कसोटीत खेळेल असेही निवडकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, कागारूंच्या वेगवान आक्रमणात लान्स मॉरिसने आपले स्थान कायम ठेवले आहे. नागपुरातील पहिल्या कसोटीत त्याला पदार्पण करण्याची संधी आहे. स्टार्कच्या जागी तो या कसोटीत मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. याशिवाय स्कॉट बोलँडलाही संघात ठेवण्यात आले आहे.

हँड्सकॉम्बवर भिस्त , रेनशॉचे पुनरागमन

फलंदाजांमध्ये पीटर हँड्सकॉम्ब आणि मॅट रेनशॉ यांनी कांगारू संघात पुनरागमन केले आहे, तर मार्कस हॅरिसला वगळण्यात आले आहे. संघात अॅलेक्स कॅरीसाठी कोणताही पर्यायी यष्टिरक्षक निवडण्यात आलेला नाही. गरज पडल्यास हँड्सकॉम्बला यष्टीरक्षण करावे लागणार आहे.

हँड्सकॉम्बचा अलीकडेच शेवटच्या क्षणी सिडनी कसोटीसाठी कसोटी संघात समावेश करण्यात आला. हँड्सकॉम्ब आणि रेनशॉ यांनी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या भारत दौऱ्यावर चारही सामने खेळले. रेनशॉने दोन अर्धशतके झळकावली तर हँड्सकॉम्बने रांचीमध्ये 200 चेंडूत नाबाद 72 धावांची सामना वाचवणारी खेळी केली होती. गेल्या दोन मोसमात शेफिल्ड शिल्डमध्ये हॅण्ड्सकॉम्बने सर्वाधिक धावा केल्या आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक

9 ते 13 फेब्रुवारी : पहिली कसोटी (नागपूर)
17 ते 21 फेब्रुवारी : दुसरी कसोटी (दिल्ली)
1 ते 5 मार्च : तिसरी कसोटी (धर्मशाळा)
9 ते 13 मार्च : चौथी कसोटी (अहमदाबाद)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

17 मार्च : पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
19 मार्च : दुसरा एकदिवसीय सामना (विशाखापट्टणम)
22 मार्च : तिसरा एकदिवसीय सामना (चेन्नई)

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

Back to top button