स्वतःवर बलात्काराचे आरोप असलेल्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करू नयेत : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या होती, हे सीबीआयने सांगितले आहे. त्यामुळे ज्यांच्यावरती विनयभंगापासून ते बलात्कारापर्यंतचे आरोप आहेत, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होता त्याने आदित्य ठाकरेंवर आरोप करू नयेत. असा हल्लाबोल उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खासदार राहुल शेवाळेंवर केला. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणे हा नीचपणा आहे. शिंदे सरकार औटघटकेचं आहे. ज्यांच्यावरती बलात्कारापासून विनयभंगापर्यंत आरोप आहेत, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होता, त्या व्यक्तीने आदित्य ठाकरेंवर आरोप करणे म्हणजे फुटीर लोक किती वैफल्यग्रस्त आहेत हे स्पष्ट दिसते. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्री आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी, असे आरोप केले जात आहेत. हे सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्यानेच पडेल. बिहार पोलिसांना महाराष्ट्रात तपासाचा अधिकार नाही. फाईलची लढाई सुरू झाली, तर महागात पडेल, असा इशारा राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
भाऊ चौधरींच्या पक्षांतरावर बोलताना ते म्हणाले की, पक्षाने पदे दिली म्हणून ती मोठी झालीत. पळपुटे येतात आणि जातात पक्ष कधी संपत नाही. २०२४ ला शिवसेनेची सत्ता येईल. तेव्हा सगळ्यांचा हिशोब होईल. त्यामुळे जी कारवाई करायची ती आत्ताच करा. कर्नाटकात सीमाप्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आहेत. पण महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बाजूच्या राज्यांकडे बघावे. मुख्यमंत्री शिंदे तर शिवसेनेचे कार्यकर्ते पळवत आहेत. याला राज्य चालवणे म्हणतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
- MLA residence video : आमदारांच्या कपबशा धुतल्या जातायत टॉयलेटमध्ये : आ. मिटकरींनी शेअर केला व्हिडीओ
- Tesla Layoffs – एलन मस्क यांना मंदीची झळ; टेस्लातून होणार नोकरकपात
- वाकड पोलिस ठाण्याचा लंगडा कारभार; डीबी पथक नसल्याने गुन्हेगार मोकाट; तपासही थंडावला