कोलकाता; वृत्तसंस्था : फलंदाजीचे नंदनवन ठरलेल्या ईडन गार्डन्सवरील धमाकेदार 'आयपीएल' साखळी सामन्यात पंजाबने टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च यशस्वी पाठलाग नोंदवताना केकेआरला अक्षरश: चारीमुंड्या चीत केले, त्यावेळी अनेक विश्वविक्रमांचीही आतषबाजी झाली. एकीकडे, पंजाबने या लढतीत टी-20 क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च पाठलाग साकारला तर दुसरीकडे, एकाच सामन्यात सर्वाधिक 42 षटकारांचा नवा विक्रमही यात नोंदवला गेला. या लढतीत केकेआरच्या डावात 18, तर पंजाबच्या डावात चक्क 24 षटकार फटकावले गेले.
केकेआरने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 6 बाद 261 धावांची आतषबाजी केल्यानंतर पंजाबने तोडीस तोड प्रत्युत्तर देत तब्बल 8 गडी व 8 चेंडूंचा खेळ बाकी राखत धडाकेबाज विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले. विजयासाठी 262 धावांचे आव्हान असताना बेअरस्टो (48 चेंडूंत नाबाद 108), शशांक सिंग (28 चेंडूंत नाबाद 68), प्रभसिमरन सिंग (20 चेंडूंत 54), रिली रॉस्यू (16 चेंडूंत 26) यांची फटकेबाजी सहज विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुरेशी ठरली.
जॉनी बेअरस्टोने प्रभसिमरनसह 93 धावांची सलामी दिली, तर तिसर्या स्थानावरील रिली रॉस्यूसह 85 धावांची भागीदारी केली. रॉस्यू दुसर्या गड्याच्या रूपाने बाद झाल्यानंतर बेअरस्टाने शशांकसह विजयाचे सोपस्कार अवघ्या 18.4 षटकांतच पार केले!
प्रारंभी, पंजाबने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि हा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे लवकरच सिद्ध झाले. फिल सॉल्ट व सुनील नारायण या सलामीवीरांनी अवघ्या 10.2 षटकांत 138 धावांचा दणकेबाज फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला होता. सॉल्टने 37 चेंडूंत 6 चौकार, 6 षटकारांसह 75, तर सुनील नारायणने 32 चेंडूंत 9 चौकार, 4 षटकारांसह 71 धावांची आतषबाजी केली.
या जोडीने पहिल्या टप्प्यापासूनच आक्रमक फटकेबाजीवर भर देत पंजाबच्या गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. डावातील 11 व्या षटकात चहरने नारायणला बेअरस्टोकरवी बाद करत ही जोडी फोडली; पण तोवर या उभयतांनी आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडली होती. त्यानंतर 13 व्या षटकात सॉल्ट दुसर्या गड्याच्या रूपात बाद झाला. त्याचा कुरेनने त्रिफळा उडवला. मधल्या फळीत वेंकटेश अय्यर (39), आंद्रे रसेल (24), श्रेयस अय्यर (28) यांनी दुहेरी धावसंख्या गाठली, तर रिंकू सिंग 5 धावांवर बाद झाला. पंजाबतर्फे अर्शदीप सिंगने 45 धावांत 2, तर सॅम कुरेन, हर्षल पटेल, राहुल चहर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.