पुढारी ऑनलाईन डेस्क : "माझ्या पक्षातील कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा." असं ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीला उद्देशून त्यांनी पत्र लिहित संताप व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर बातमी. (MNS Social Media)
गेले काही दिवस मनसेमध्ये गटबाजीच्या अनेक घटना समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पक्षातील अंतर्गत गटबाजीचे दर्शन वेळोवेळी झाले आहे. या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पत्र लिहित धारेवर धरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी! असं लिहित हे ट्विट त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. वाचा राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात नेमके काय म्हंटले आहे,
"माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,
सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.
माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा.
ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या !"
हेही वाचा