वाकड पोलिस ठाण्याचा लंगडा कारभार; डीबी पथक नसल्याने गुन्हेगार मोकाट; तपासही थंडावला | पुढारी

वाकड पोलिस ठाण्याचा लंगडा कारभार; डीबी पथक नसल्याने गुन्हेगार मोकाट; तपासही थंडावला

संतोष शिंदे

पिंपरी : अवैध धंद्याला अभय दिल्याचा ठपका ठेवून वाकड पोलिस ठाण्याचे’डीबी’ (तपास पथक) बावधन वाहतूक विभाग येथे संलग्न करण्यात आले. महिन्यापूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचा आदेश दिले आहेत. पोलिस ठाण्यात ’डीबी’ नसल्याने हद्दीतील गुन्हेगार मोकाट सुटले असून अनेक प्रकरणांचा तपासही थंडावला आहे. एकंदरीतच ’डीबी’ बरखास्त केल्यापासून वाकड पोलिस ठाण्याचा लंगडा कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

डीबी म्हणजे, पोलिस ठाण्याचे नाक
पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये एक डीबी तपास पथक आहे. या पथकाला पोलिस ठाण्याचे नाक समजले जाते. सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची या पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली जाते. तसेच, दहा ते पंधरा कर्मचार्‍यांची पथकात नेमणूक केली जाते. हद्दीची व गुन्हेगारांची इतंभूत माहिती असणार्‍या कर्मचार्‍यांना या पथकात घेतले जाते.

गुन्हेगार मोकाट
वाकड पोलिस ठाण्याच्या संपूर्ण डीबीची उचलबांगडी होऊन महिना उलटून गेला आहे. डीबी नसल्याने प्रतिबंधात्मक कारवायादेखील कमी झाल्या आहेत. त्यामुळे हद्दीतील पोलिस सुस्त अन गुन्हेगार मस्त अशीच काहीशी परिस्थिती वाकड हद्दीत पहावयास मिळत आहे. सध्या वाकडमध्ये डीबी पथक नसल्याने केवळ गुन्हे दाखल करण्याचा धडाका सुरू आहे.

वचक ठेवण्याचा मोठा ’टास्क’
पोलिस ठाण्यातील डीबी पथकाकडे गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच हद्दीतील गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा मोठा टास्क असतो. त्यासाठी डीबी पथकातील कर्मचारी गुन्हेगारांवर पाळत ठेवून असतात. सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जाते.

नवीन आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार सोडण्यापूर्वी काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांच्याकडे वाकडच्या डीबीसह अन्य पोलिसांवर केलेल्या कारवाईबाबत पुनर्विचार करण्यातची विनंती केली होती. मात्र, अंकुश शिंदे यांनी ’त्या’ पोलिसांचा निर्णय नवीन आलेले पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे सोपवून निरोप घेतला. त्यामुळे आता पोलिस आयुक्त चौबे याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वाधिक गुन्हेगारी टोळ्या वाकडमध्येच
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 85 सक्रिय सदस्य असलेल्या 13 गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात वाकड हे अतिशय हॉट’ पोलीस ठाणे समजले जाते. हद्दीत दररोज भांडणे, मारामार्‍या छेडछाड, विनयभंग यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे वाकड पोलिस ठाण्यात ’डीबी’ असणे फार महत्त्वाचे आहे.

वाकडचे तपास पथकातील दोन अधिकारी आणि 13 कर्मचारी बावधन वाहतूक विभाग येथे संलग्न करण्यात आले आहेत. तेव्हापासून इतर अधिकर्‍यांसह कर्मचार्‍यांवर ताण आला आहे. त्यामुळे लवकरच डीबी पथक पुन्हा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

                                                               – डॉ. काकासाहेब डोळे,
                                                           पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड.

Back to top button