E Peek Pahani : सात बारा उताऱ्यावर ई-पीक पाहणी नोंद करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या - पुढारी

E Peek Pahani : सात बारा उताऱ्यावर ई-पीक पाहणी नोंद करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : E Peek Pahani : शेत जमीन ज्या पद्धतीने आपण कसतो त्या पद्धतीने तिची नोंदणी योग्य ठेवणे सध्या काळाची गरज बनली आहे. सातबारा उतार्‍यावर क्षेत्राबरोबर पिकाची नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. सातबाऱ्यावर तलाठीच्या माध्यमातून कोतवालाकडून आपण पिकाची नोंद करून घेत असतो.

शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावण्यासाठी पिकांची नोंद करणे महत्त्‍वाचे असते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. याचा शेतकऱ्याला मोठा फायदा होत असतो.

मागील काही वर्षांमध्ये तलाठ्यांची संख्या घटल्याने दोन-तीन गावांचा कार्यभार एक तलाठ्यावर पडताे. त्‍यामुळे  शेतकऱ्यांना पिकांची नोंद करणे अशक्य होत आहे. यासाठी शेतकरी आणि तलाठी यांच्यात काही वेळा वादाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, यावर राज्य सरकारने एक अभिनव कल्पना काढली आहे.

E Peek Pahani : महसूल विभागाने तलाठ्यांचे काम केले सोपे

महसूल विभागाने आपल्या पिकाची  नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल खात्याकडून यासाठी स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन निर्मिती केली आहे. याबाबत स्वत: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे. ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर राबवण्यात येत आहे.

टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती ॲप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे.

पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल.

E Peek Pahani

आपल्याकडे हस्तलिखित सातबारा उतार्‍यावर ठरावीक पिकांची नोंद झालेली पहायला मिळायची. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील असाल तर तुमच्या पीक पाहणी नोंदीवर ऊस, भुईमुग या पिकांची नोंद झालेली दिसेल. अशाप्रकारे राज्यातील विवीध भागात तुम्हाला पिकांच्या नोंदी आढळतील. पण, या मुख्य पिकांव्यतिरिक्त शेतात कमी क्षेत्रावर का होईन पण इतरही पीके घेतली जातात.

आता आपल्या शेतातील या सगळ्या पिकांची नोंद शेतकरी ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून सातबारा उताऱ्यावर नोंदणी होणार आहेत. याचा नेमका फायदा शेतकऱ्याला होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अपलोड केलेले पिकांचे फोटो real time data capture करणार आहेत. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने नेमका कोणत्या गट क्रमांकातून आणि खाते क्रमांकातून तो फोटो काढला, हे कळेल, असा सरकारकडून सांगण्यात आले आहे.

पिकांची नोंद करण्याची प्रक्रिया

ई-पीक पाहणी हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. E-Peek Pahani असं सर्च केल्यावर हे ॲप हिरव्या रंगातील असेल त्यावर क्लिक करून इन्स्टॉल वर क्लिक करायचं.

 अप डाऊनलोड झाल्‍यानंतर ओपन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. दरम्यान तुम्ही या ॲपवर गेल्यावर दोनवेळा डावीकडे नेक्स्ट करायचे आहे. यावेळी पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची आवश्यकता आहे ती माहिती मिळेल. सातबारा, 8-अ अशा बाबी आपल्याला दिसतील.

यानंतर मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट वर क्लिक करा. जिल्हा, तालुका गाव निवडून पुन्हा नेक्स्टवर क्लिक करा.त्यानंतर खातेदार निवडून तुम्ही तुमचा गटक्रमांक ज्यांच्या नावे जमीन आहे त्यांचे पूर्ण नाव टाकायचे आहे. गटक्रमांक टाकून शोधावर हा पर्यायावर क्लिक करून मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे.

त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून तुम्ही जो मोबाईल क्रमांक सुरुवातीला दिला त्यावर तुमची नोंदणी करण्यात येत आहे, असा मेसेज तुम्हाला येईल. तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा किंवा पुढे वर क्लिक करा. या नंबरवर तुम्‍हाला एक सांकेतिक क्रमांक पाठवला जाईल. हाच नंबर या ॲपवर शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी वापरावा लागणारा आहे.आता तिथं एक सूचना येईल – मोबाईलवर सांकेतांक क्रमांक पाठवला आहे, तो स्क्रीनवरील रिकाम्या चौकटीत टाका. इथं ठीक आहे असं म्हणायचं आहे.

पीक पाहणीच्या ॲपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता

मोबाईलवर आलेला सांकेतांक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि सांकेतांक भरा यावर क्लिक करा. आता पीक पाहणीच्या ॲपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता.

इथं सुरुवातीला परिचय द्यायचा आहे. यात खातेदाराचा फोटो असेल तर तो निवडायचा आहे. त्यानंतर लिंक निवडलं की खातेदाराचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर तिथं आपोआप येऊन जाईल; मग खातेदाराची माहिती यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. यानंतर परिचयमध्ये परत येऊन सबमिट वर क्लिक करायचं आहे. तुमची नवीन माहिती अद्यावत झाली असा तिथं मेसेज येईल.

इथं ठीक आहे वर क्लिक करायचं आहे. आता पुन्हा होमवर परत यायचं आहे.

पीक पाहणी नोंदवण्याची अशी आहे सोपी पद्धत

इथं सुरुवातीला तुम्हाला खाते क्रमांक आणि त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे. या गट क्रमांकात संबंधित शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे ही माहिती तिथं आपोआप येईल. पुढे हंगाम (खरीप की संपूर्ण वर्ष) निवडला की, पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र तिथं आपोआप येईल. या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर तुम्हाला पिकांची नोंद करता येणार नाही.

त्यानंतर पिकाचा वर्ग जसं की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. पुढे मुख्य पीक निवडून ते किती गुंठ्यांमध्ये आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर मग दुय्यम पीक १ आणि दुय्यम पीक २ याची माहिती टाकावी, ते किती क्षेत्रावर आहे तेही टाकायचं आहे.

एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.ही सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला आपण वरती जे पीक मुख्य म्हणून सांगितलं त्याचा फोटो अपलोड करायचा आहे.

हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.फोटो काढून झाला की, ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिकांची नोंद केली ते पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

यावरील शेवटच्या सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.तिथं सूचना येईल की, पीक माहिती सबमिट आणि अपलोड झाली आहे. तिथं ठीक आहे यावर क्लिक करायचं आहे.आता आपण नोंदवलेली पिकांची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नंतर स्क्रीनवर तुम्हाला कोणत्या गटातल्या कोणत्या खाते क्रमांकात कोणत्या पिकाची नोंद करण्यात आली आहे, ही माहिती तिथं दिसेल.

एक आणि अनेक क्षेत्रांची नोंद करण्याची पद्धत

नोंद आता तुम्हाला दुसऱ्या एखाद्या गटातल्या किंवा इतरही पिकांची नोंद करायची असेल तर + या बटनावर क्लिक करून तुम्ही आताची प्रक्रिया पुन्हा करू शकता.

अशाचप्रकारे या ॲपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता.एकदा का ही सगळी माहिती भरून झाली की तलाठी कार्यालयात या माहितीची छाननी केली जाईल आणि मग सातबाऱ्यावर पिकांची नोंद होईल.

हेही वाचलं का?

Back to top button