

सत्यजित दुर्वेकर
विमा क्षेत्रातील बदलत्या नियमांनुसार आता केवळ वय आणि उत्पन्नच नव्हे, तर तुमची शैक्षणिक पात्रता देखील टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियमवर आणि तो मिळणार की नाही यावर मोठा प्रभाव टाकत आहे.
भारतीय विमा बाजारपेठेत पदवीधर आणि बिगर-पदवीधर अशा दोन श्रेणींमध्ये विमा कंपन्यांनी स्पष्ट विभागणी केली असून, यामुळे मिळणार्या विम्याच्या रकमेत आणि द्याव्या लागणार्या प्रीमियममध्ये मोठी तफावत दिसून येते.
विमा कंपन्यांच्या द़ृष्टिकोनातून पदवीधर असणे हे केवळ शैक्षणिक यश नसून, ते आर्थिक स्थिरता आणि जबाबदार जीवनशैलीचे निदर्शक मानले जाते. आकडेवारीनुसार, जे लोक किमान पदवीधर आहेत, त्यांना विमा कंपन्या ‘कमी जोखमीचे’ ग्राहक मानतात. याचे मुख्य कारण म्हणजे पदवीधर व्यक्तींना सहसा कॉर्पोरेट किंवा संघटित क्षेत्रात नोकरी मिळते, जिथे कामाचे स्वरूप शारीरिकद़ृष्ट्या कमी जोखमीचे असते. याउलट, बिगर-पदवीधर व्यक्ती अनेकदा असंघटित क्षेत्रात किंवा अशा कामांमध्ये गुंतलेल्या असतात, जिथे अपघाताची किंवा आरोग्याच्या समस्यांची शक्यता तुलनेने जास्त असते. यामुळेच अनेक नामवंत विमा कंपन्या पदवीधरांना प्रीमियममध्ये 5 ते 10 टक्क्यांपर्यंत सवलत देतात किंवा त्यांना कमी दरात उच्च विमा संरक्षण उपलब्ध करून देतात.
विविध कंपन्यांचे निकष आणि अटी
भारतातील अग्रगण्य विमा कंपन्या जसे की एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि मॅक्स लाईफ यांच्या नियमावलीत शिक्षणाला विशेष स्थान आहे. अनेक कंपन्यांच्या ‘प्युअर टर्म प्लॅन्स’मध्ये 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा विमा हवा असेल, तर अर्जदार किमान पदवीधर असणे अनिवार्य असते. जर एखादी व्यक्ती पदवीधर नसेल, तर तिला ठराविक मर्यादेपेक्षा (उदा. 25 ते 50 लाख) जास्त रकमेचा विमा नाकारला जाऊ शकतो किंवा त्यासाठी अतिरिक्त प्रीमियम आकारला जातो. टाटा एआयएसारख्या कंपन्यांमध्ये तर शैक्षणिक पात्रतेनुसार ग्राहकांचे ‘अंडररायटिंग’ केले जाते, ज्यामध्ये पदवीधरांना प्रीफर्ड श्रेणीत ठेवून स्वस्त प्रीमियमचे पर्याय दिले जातात.
बिगर-पदवीधरांसाठी प्रीमियम जास्त असण्याची कारणे
विमा कंपन्या ‘लॉ ऑफ लार्ज नंबर्स’ आणि ‘डेटा अॅनालिटिक्स’वर आधारित काम करतात. त्यांच्याकडे असलेल्या माहितीनुसार, उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता जास्त असते आणि ते नियमित वैद्यकीय तपासणी करण्याकडे कल ठेवतात. बिगर-पदवीधरांच्या बाबतीत, विमा कंपन्यांना ‘मॉरॅलिटी रिस्क’ जास्त वाटते. शिक्षणाअभावी अनेकदा रोजगाराच्या संधी मर्यादित असतात, ज्यामुळे उत्पन्नाची शाश्वती कमी असू शकते. उत्पन्नातील चढ-उतारामुळे पॉलिसी लॅप्स होण्याचे प्रमाण बिगर-पदवीधरांमध्ये जास्त आढळते. तसेच, व्यावसायिक धोके आणि राहणीमानाचा दर्जा या घटकांमुळे त्यांच्या आयुर्मानावर परिणाम होऊ शकतो, असे विमा कंपन्यांचे गणित सांगते. म्हणूनच, जोखमीची भरपाई करण्यासाठी या श्रेणीतील ग्राहकांकडून अधिक प्रीमियम वसूल केला जातो.
टर्म इन्शुरन्स घेताना केवळ कमी प्रीमियमकडे न पाहता, आपल्या शैक्षणिक पात्रतेचे योग्य पुरावे सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पदवीधर असाल, तर विम्याच्या अर्जासोबत तुमची पदवी प्रमाणपत्रे नक्की जोडा, जेणेकरून तुम्हाला ‘प्रीफर्ड रेटस्’चा लाभ मिळू शकेल. दुसरीकडे, बिगर-पदवीधरांसाठी आता सरल जीवन विमासारखे पर्याय उपलब्ध आहेत, जे विशेषतः कमी उत्पन्न आणि कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या लोकांसाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र, तिथे विम्याची रक्कम मर्यादित असते. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी शिक्षण ही केवळ नोकरीसाठीची अट नसून ती तुमच्या कुटुंबाला स्वस्त दरात मोठे विमा कवच मिळवून देणारी गुरुकिल्ली ठरत आहे. विमा हप्त्यातील तफावत आणि शैक्षणिक पात्रतेचा प्रभाव समजून घेण्यासाठी विविध कंपन्यांच्या नियमांचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक आहे.
एक कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्ससाठी एचडीएफसी लाईफसारख्या नामांकित कंपनीमध्ये 30 वर्षे वयोगटातील पदवीधर व्यक्तीला साधारणपणे 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान वार्षिक प्रीमियम पडतो, तर याच वयोगटातील बिगर-पदवीधर व्यक्तीसाठी हाच हप्ता 12,000 ते 13,500 रुपयांपर्यंत जातो. याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीत बिगर-पदवीधरांसाठी विमा संरक्षणाची मर्यादा अनेकदा कमी ठेवली जाते. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलमध्ये देखील अशीच स्थिती पाहायला मिळते. तिथे पदवीधरांना ‘प्रीफर्ड’ म्हणजे पसंतीची शेणी दिली जाते, ज्यामुळे त्यांचा हप्ता 9,200 ते 10,200 रुपयांच्या आसपास असतो. याउलट, बिगर-पदवीधरांना 11,800 ते 13,000 रुपये मोजावे लागतात.
मॅक्स लाईफ कंपनीच्या नियमानुसार, जर तुम्हाला 1 कोटी रुपयांचे विमा संरक्षण हवे असेल, तर पदवीधर असणे अनिवार्य आहे. तिथे पदवीधरांसाठी 8,800 ते 9,800 रुपयांचा हप्ता आकारला जातो, तर पदवी नसलेल्यांना 11,500 ते 12,500 रुपये द्यावे लागतात. टाटा एआयए आणि बजाज अलायन्झ या कंपन्यांमध्ये शिक्षणासोबतच उत्पन्नाच्या पुराव्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. टाटा एआयए मध्ये पदवीधरांचा हप्ता 9,700 ते 10,700 रुपये असून, बिगर-पदवीधरांसाठी तो 12,500 ते 14,000 रुपयांपर्यंत वाढतो. बजाज अलायन्झमध्ये पदवी नसलेल्या व्यक्तींना केवळ जास्त प्रीमियमच भरावा लागत नाही, तर त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे (मेडिकल टेस्ट) निकषही अधिक कडक असतात. तेथे पदवीधरांना 9,400 ते 10,400 रुपयांत विमा मिळतो, तर इतरांना 11,700 ते 13,200 रुपये खर्च करावे लागतात.