शिवारातून लगबग वाढली ; पावसाने शेतकर्‍यांना मिळाला दिलासा | पुढारी

शिवारातून लगबग वाढली ; पावसाने शेतकर्‍यांना मिळाला दिलासा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा संततधार पावसाने शेतीकामांना जोर आला आहे. रविवारी शिवारातून शेतकर्‍यांची लगबग वाढल्याचे दिसून आले. पेरणीसह अन्य शेतीकामे जोमाने सुरू असून, शिवारातून गर्दी वाढली आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागात रताळी लागवडीची लगबग वाढली आहे.

मृग नक्षत्र यावर्षी अपवाद वगळता पूर्णपणे कोरडे गेले. मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे मशागतीची कामे आटोपण्यात आली आहेत. परंतु, मृग नक्षत्राने पूर्णपणे पाठ फिरवल्याने पेरणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला होता. तालुक्यात पावसाने दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणासह संततधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. परिणामी पावसाअभावी थांबलेली शेतीची कामे पुन्हा जोमाने सुरू झाली आहेत. भात पेरणी 80 टक्यांहून अधिक प्रमाणात झाली आहे. उगवणही चांगल्याप्रकारे झाल्याने मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे.

पश्‍चिम भागात रताळ्याचे बांध यापूर्वीच तयार करण्यात आले आहेत. पावसाने हजेरी लावल्यानंतर वेल लागवडीला जोर आला आहे. शेतकरी वेल लागवडीच्या कामात गुंतले आहेत. मागील वर्षी रताळ्यांना चांगला दर मिळाल्याने यावर्षी रताळ्याच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याची माहिती शेतकर्‍यांकडून देण्यात आली.

तरव्याची प्रतीक्षा

भात रोप लागवडीचे क्षेत्रही अलीकडे वाढले आहे. यासाठी तरव्यांची पेरणी करण्यात आली आहे. त्यांची उगवण झाली असून रोप लागवडीसाठी तरवे वाढीबरोबरच संततधार पावसाची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागून राहिली आहे. शेतकर्‍यांची शिवारातील लगबग वाढली आहे.

हेही वाचा

Back to top button