सोलापूर : सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसवरील ताण होणार कमी | पुढारी

सोलापूर : सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसवरील ताण होणार कमी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेसवर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मुंबई मार्गावर धावणार्‍या गदग एक्सप्रेसला (मिनी सिद्धेश्वर) अतिरिक्त चार डब्यांची वाढ केली आहे. दरम्यान, 29 जून पासून कोल्हापूर-मुंबई ही कोयना एक्सप्रेस मुंबईला न थांबवून ठेवता ती सोलापूरमार्गे गदगला नेण्यात येणार आहे.
सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस नेहमी हाऊसफुल्ल राहत असल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनरल तिकीट पूर्णतः बंद करण्यात आल्यामुळे तसेच रिझर्वेशन लवकर मिळत नसल्यामुळे मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना वेटिंगचे तिकीट काढून ताटकळत प्रवास करावा लागत होता. आता प्रवाशांना मिनी एक्सप्रेसचा दिलासा मिळाला आहे.

वेटिंगवर असलेल्या प्रवाशांना तिकीट कन्फर्म होण्यासही मदत होणार आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून 29 जूनपासून सर्व जनरल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 29 जूनपासून मुंबई- कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस तर 30 जूनपासून गदग – मुंबई ही लिंक एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे.
कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर वरून मुंबईत पोहोचल्यानंतर तेथे थांबवून न ठेवता लिंक एक्सप्रेस म्हणून पुढे मुंबई सोलापूर मार्गे गदगला जाणार आहे.

गदग एक्स्प्रेसला अतिरिक्त चार नव्या डब्याची वाढ करण्यात आली असून या एक्सप्रेसमध्ये एक प्रथम, द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, दोन वातानुकूलित चेअरकार, चार शयनयान, एक सामान्य द्वितीय श्रेणी, चार सामान्य द्वितीय आसन श्रेणी व दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड, ब्रेक व्हेन जोडण्यात येणार आहे.यामुळे सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून दररोज कामानिमित्त पुण्या-मुंबईच्या दिशेकडे जाणार्‍या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

सोलापूर गदग एक्स्प्रेसला (मिनी सिद्धेश्‍वर) डब्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना धक्काबुक्की करत प्रवास करावा लागत होता. रेल्वेने डब्यांच्या संख्येत वाढ केल्यामुळे नक्कीच सोलापूरकरांना याचा फायदा होईल.
– संदीप जाधव
प्रवासी.
सोलापूरहून मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून गदग-मुंबई एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे वाढवण्यात येणार आहेत. 29 जूनपासून प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. प्रवाशांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्यास मदत होईल.
– प्रदीप हिरडे,
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर.

Back to top button