काँग्रेसला सामान्यांची संपत्ती लुटायची आहे : पंतप्रधान मोदी | पुढारी

काँग्रेसला सामान्यांची संपत्ती लुटायची आहे : पंतप्रधान मोदी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चन्नम्मा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत. पण काँग्रेसचे नेते आमचे राजा, महाराजा लूट करत होते, असे सांगत सुटले आहेत. त्यांना नवाब, सुलतान, बादशाह यांनी केलेली लूट दिसत नाही. आता काँग्रेसला सामान्य जनतेच्या घरावर छापा टाकून संपत्ती लुटायची आहे. मात्र जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत कोणताही पंजा तुमची संपत्ती लुटू शकत नाही. त्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करून माझे हात बळकट करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 28) जाहीर सभेत केले.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ रविवारी पंतप्रधान मोदी यांची विराट सभा झाली. सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदी म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर महाराज यांना आदर्श मानून गेल्या दहा वर्षात भारत शक्तिशाली बनवण्याचे काम केले आहे. त्यामुळेच भारताची लोकशाही जगात नाव कमवत आहेे. दहा वर्षांत 25 कोटीहून अधिक लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढले. त्यामुळे सामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. पण काँग्रेसला देशहिताशी काही देणे देणे नाही. काँग्रेस घराणेशाहीत गुंतलेला आहे. लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी त्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतले. पण दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवर आक्षेप घेणार्‍या काँग्रेसला चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागणे आवश्यक आहे. देशाचे नुकसान करण्यासाठी काँग्रेस कोणाच्या इशार्‍यावर काम करत आहे, हे आता जनतेने ओळखले पाहिजे.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुुराप्पा यांच्यासह उमेदवार जगदीश शेट्टर, अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार संजय पाटील, खासदार मंगल अंगडी, खासदार इराण्णा कडाडी, डॉ. प्रभाकर कोरे यांची भाषणे झाली. आमदार रमेश जारकीहोळी, माजी मंत्री श्रीमंत पाटील आदी उपस्थित होते.

औरंगजेबाचे गुणगान करणार्‍यांशी आघाडी

आम्ही पीएफआय या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली. पण, या संघटनेची मदत घेऊन काँग्रेस निवडणूक लढवत आहे. राहुल गांधी हे देशातील राजा, महाराजा अत्याचारी होते. त्यांनी गरिबांची लूट केली, असे सांगत सुटले आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चन्नम्मा यांचा अपमान आहे. काँग्रेसला म्हैसूर घराण्याचे योगदान आठवत नाही. नवाब, निजाम, सुलतान, बादशहा यांनी केलेल्या अत्याचारावर ते बोलत नाहीत. काँग्रेसला औरंगजेबाने केलेला अत्याचार दिसत नाही. याउलट औरंगजेबाचे गुणगान करत राहणार्‍या पक्षाबरोबर त्यांची आघाडी आहे, असा आरोप मोदींनी केला.

Back to top button