शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा | पुढारी

शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा

माळशिरस : पुढारी वृत्तसेवा जून महिन्याची 26 तारीख उलटली तरी अद्याप माळशिरस तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणी साठी चिंतातूर झाला आहे. खरिपासाठी शेताची मशागत करून ठेवली असली तरी चांगल्या पावसाची गरज आहे. आजपर्यंत दोन पाऊस आले असले तरी चांगल्या दमदार पावसाची गरज आहे. माळशिरस तालुक्यात खरिपाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. तालुक्यात 8 जून रोजी 26 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर गुरुवारी 17 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. परंतु, खरिपाच्या पेरणीसाठी अजून दमदार पावसाची गरज होती. कारण, या वर्षीचा उन्हाळा चांगलाच तापवून गेल्याने जमिनीची धूप अद्याप कमी झाली नाही. त्यामुळे तालुक्यात भाटघर, वीर, देवधर, उजनी ही धरण पाणलोट सिंचन क्षेत्रे सोडल्यास तालुक्याच्या इतर भागांत अजून दमदार पावसाची आवशक्यता आहे.

माळशिरस तालुक्यात मका, बाजरी यांसारखी पिके खरिपात घेतली जातात. तालुक्याच्या भांब, रेडे, मांडकी, जळभावी, गारवाड या डोंगरी भागात काही शेतकरी खरिपात कांदा पीक घेतात. त्यामुळे त्या भागात चांगल्या पावसाची आवश्यता असते. माळशिरस तालुक्यात या हंगामात फक्त 10 ते 15 टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. परंतु, या महिन्यात झालेल्या दोन पावसांमुळे काही ठिकाणी शेतकरी खरिपाची पेरणी करीत आहेत. परंतु, आता तेथे पेरणी झाल्यावर दमदार पावसाची गरज आहे. तालुक्यात काही भागांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसला तरी शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. कारण, या आधीच शेतकर्‍यांनी शेताच्या मशागती करुन ठेवल्या आहेत. तालुक्यातील सर्व कृषी दुकानात मका, बाजरी यांसह सर्व खरिपाचे बी-बियाणे अनेक प्रकारचे विक्रीसाठी आले आहेत.

कृषी दुकानात मक्याची चार किलोची बॅग 500 रुपयांपासून 1200 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे, तर बाजरी 300 ते 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. खरिपापासून शेतकर्‍यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असते व उत्पन्नही मिळते. त्यामुळे खरिपासाठी शेतकर्‍यांना आता चांगल्या दमदार पावसाची आवश्यकता आहे.

झालेल्या पेरण्यांना पाऊस ठरतोय उपकारक
माळशिरस तालुक्यासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यांतही रविवारी दुपारी दीड वाजल्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या, तर काही भागांत दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागांत शेतकर्‍यांनी केलेल्या पेरणीला हा पाऊस चांगला ठरला आहे, तर ऊस, चारा पिकांनाही दिलासा मिळाला आहे.

दहा मंडलांत आजपर्यंत झालेला पाऊस
माळशिरस 64 मिमी, अकलूज 66 मिमी, वेळापूर 93 मि.मी., नातेपुते 35 मि.मी., पिलीव 57 मि.मी., दहिगाव 27 मि.मी., महाळुंग 34 मि.मी., लवंग 20 मि.मी., इस्लामपूर 26 मि.मी., सदाशिवनगर 49 मि.मी. अशी नोंद झाली आहे.

Back to top button