नगर जिल्ह्यातील 11 बसस्थानकांना झळाळी | पुढारी

नगर जिल्ह्यातील 11 बसस्थानकांना झळाळी

नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसहभागातून बसस्थानकांचा कायापालट सुरू आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 29 बसस्थानके आता स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहेत. आतापर्यंत अकोले, कोपरगाव, कोल्हार बुद्रुक, नेवासा, सोनई, पारनेर आदींसह अकरा बसस्थानकांची रंगरंगोटी झाली असून, सेल्फी पॉइंट आणि आसन व्यवस्थेमुळे बसस्थानके सुंदर आणि सुशोभित झाली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी महामंडळाचे प्रत्येक बसस्थानक, स्वच्छतागृह व परिसर स्वच्छ आणि टापटीप असावा, बसदेखील आकर्षक आणि स्वच्छ असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे महामंडळाने वर्षभरासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान’ राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या अभियानासाठी राज्यातील 580 बसस्थानकांची निवड केली आहे. यामध्ये नगर शहरातील तारकपूर, माळीवाडा, स्वस्तिक, तसेच जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, कोल्हार बुद्रुक, लोणी बुद्रुक, नेवासा, शेवगाव आदींसह 29 बसस्थानकांचा समावेश आहे. अहमदनगर विभागाने आगारप्रमुखांची बैठक घेऊन, लोकसहभागातून जास्तीत जास्त कामे करावीत, त्यासाठी प्रायोजक शोधमोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अकोले, लोणी बुद्रुक, कोपरगाव, मिरजगाव, नेवासा, सोनई, पारनेर, सुपा, श्रीगोंदा, श्रीरामपूर व कोल्हार बुद्रुक या अकरा बसस्थानकांसाठी त्या त्या गावांतील प्रायोजक पुढे आले.

त्यांनी बसस्थानकांची रंगरंगोटी व इतर सुशोभीकरण केले. त्यामुळे बसस्थानके चकाकू लागली आहेत. नगर शहरातील तारकपूर, माळीवाडा व स्वस्तिक या बसस्थानकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. स्वस्तिक बसस्थानक सुशोभीकरणासाठी एक-दोन नगरसेवक पुढे आले आहेत. माळीवाडा, तारकपूर व इतर बसस्थानकांच्या सुशोभीकरणासाठी प्रायोजक शोधण्याचे काम सुरू आहे.

रंगरंगोटी आणि सेल्फी पॉइंट
अकोले बसस्थानकाच्या आतील बाजूस रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आले आहे. कोपरगाव बसस्थानक नवीन बांधण्यात आले आहे. रंगकाम सुस्थितीत असल्यामुळे संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली. तसेच सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले. मिरजगाव बसस्थानकाच्या आतील बाजूस रंगकाम करून सुशोभीकरण झाले. नेवासा, सोनई येथील बसस्थानकांचेही रंगकाम झाले आहे. पारनेर बसस्थानकाच्या आतील बाजूस रंगरंगोटी केली आहे. सुपा बसस्थानकदेखील सुशोभित झाले आहे. श्रीगोंदा व श्रीरामपूर बसस्थानकाला आतील बाजूस रंगरंगोटी करण्यात आली. संगमनेर बसस्थानकाच्या दर्शनी मुख्य पिलर्सचे सुशोभीकरण केले आहे.

कोल्हार, लोणी ग्रामपंचायतींचा पुढाकार
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व कोल्हार बुद्रुक या दोन्ही बसस्थानकांतून धावणार्‍या बसची संख्या अधिक आहे. कोल्हार ग्रामपंचायतीच्या वतीने कोल्हार बसस्थानकाची पूर्णपणे रंगरंगोटी करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांनी बाग-बगिचा तयार केला आहे. लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीनेदेखील बसस्थानकाचे सुशोभीकरण करण्यास पुढाकार घेतला आहे.

ही 29 बसस्थानके चकाकणार
जिल्ह्यातील अकोले, राजूर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, जामखेड, खर्डा, मिरजगाव, तारकपूर, वांबोरी, माळीवाडा, स्वस्तिक, नेवासा, सोनई, पाथर्डी नवीन, पाथर्डी (जुने), पारनेर, सुपा, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, राशीन, श्रीरामपूर, बाभळेश्वर, राहुरी, कोल्हार बुद्रुक, बेलापूर, संगमनेर व लोणी बुद्रुक या 29 बसस्थानकांचा स्वच्छता अभियानात समावेश आहे.

 हेही वाचा : 

नीरा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरी चिंतेत

पुण्यातील मस्तानी तलाव कोरडा होण्याच्या मार्गावर

Back to top button