झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन! मतभेदाच्या शाब्दिक तोफा थंडावल्या | पुढारी

झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन! मतभेदाच्या शाब्दिक तोफा थंडावल्या

खेड : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या काळात गावागावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची बाजू मांडत जोरदार प्रचार केला. गावातील विविध मुद्दे घेऊन एकमेकांवर शाब्दिक वॉर केले. इतकेच नव्हे तर हा वाद कधीकधी शिवीगाळीपर्यंत विकोपाला गेला. मात्र, निवडणूक प्रक्रिया पार पडताच ‘झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन..!’ असे प्रेमाचे संदेश ग्रुपवर फिरू लागल्याने एकमेकांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा गोडवा निर्माण होऊ लागला आहे.

निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वपक्षीय समर्थकांना मोठा जोर चढला होता. आपल्या नेत्याचे कौतुक करण्यापासून विरोधी नेत्याचे जमेल तसे वाभाडे काढण्यापर्यंत सगळे प्रकार निवडणूक काळात झाले. जणू कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. अनेकांनी येथील स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवून नेत्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. अनेकांनी सुकलेली शेती, आटलेले पाणी, कमी झालेले दूधदर, पडलेले कांद्याचे बाजारभाव हे प्रश्न उपस्थित केले; तर अनेकांनी दहशत, गुंडगिरी, खुंटलेला विकास, खुनशी राजकारण आदींवर चर्चा केली.

एकाच गावात राहून राजकारण करणारे कार्यकर्ते अगदी देशाचा कारभार सोशल मीडियावरून हाकत होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची चर्चा गावातल्या ग्रुपवर करून देश समृद्ध कसा होईल? काय नियोजन केले पाहिजे? कुणाला निवडून द्यावं? हे पटवून सांगत होते. अनेक ग्रुपचे सदस्य रात्री उशिरापर्यंत सक्रिय राहून पोस्टद्वारे मत मांडत होते. ठराविक मंडळी तर अवघ्या पाच मिनिटाला थेट पंतप्रधानांविरोधात पोस्ट टाकून सर्व ग्रुप खचाखच भरवत होते आणि निवडणूक संपली तरी त्यांचा हा जोर कमी होण्याचे नाव घेत नसल्याने अनेकांनी वैतागून ग्रुपमधून बाहेर पडणे पसंद केले आहे.

निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजापर्यंत ग्रुपवर चर्चा होत असताना अनेकांनी तर चक्क झालेल्या मतांची आकडेवारीसह आपला नेता किती मतांनी विजय होणार? याचीही आकडेवारी जाहीर करून निकाल देऊन टाकला. अनेक स्थानिक नेतेमंडळी अजूनही आपापल्या नेत्याच्या विजयाची स्वप्ने पाहून गुलालाच्या वर्गणीसाठी तयारीत आहेत. मात्र, कुणाला तरी यश-अपयश पचवावे लागणार आहे. प्रचाराच्या काळात दिसलेला टीकेचा सूर, शाब्दिक वॉर आणि कडवटपणा मागे ठेवा. निवडणुका संपल्या आहेत. आता जवळच्यांशी, मित्रांशी असलेले संबंध जपा, हे सांगणारा ‘झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन! हा मेसेज सर्वांना प्रेमसंबंध जपून भानावर आणणारा ठरत आहे.

‘बापाला बोल; पण नेत्यावर काही बोलू नको’!

अनेक कार्यकर्त्यांवर नेत्याचा इतका प्रभाव पडला आहे की, ‘बापाला बोल; पण नेत्यावर काही बोलू नको’ अशी त्यांची भूमिका दिसून येत आहे. नेत्यांसाठी वेडा झालेला कार्यकर्ता मित्र, नातेवाईक, सगेसोयरे आदींच्या प्रेमावर पाणी ओतून नेत्यासाठी वाट्टेल ते करण्याचा तयारीत आहेत. जेव्हा नेत्यांकडून अपेक्षाभंग होईल तेव्हा हेच कार्यकर्ते नेत्याचा राग राग करतील.

हेही वाचा 

Back to top button