स्थलांतरित पक्ष्यांसाठी बारामती सुरक्षित : खरे | पुढारी

स्थलांतरित पक्ष्यांसाठी बारामती सुरक्षित : खरे

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जगभरातील वेगवेगळ्या भागांतून अनेक पक्षी दर वर्षी स्थलांतर करून बारामतीत वास्तव्यास येतात. बारामती त्यांच्या दृष्टीने सुरक्षित असे ठिकाण आहे, असे मत निसर्ग व पक्षी अभ्यासक अनुज खरे यांनी व्यक्त केले. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील नक्षत्र गार्डन येथे शनिवारी (दि.3) निसर्ग भ्रमंतीचे आयोजन केले होते. या वेळी खरे यांनी बारामतीकरांना सर्वांगसुंदर माहिती दिली. निसर्गभ्रमंती का करायची, याचे सहजसोप्या भाषेत त्यांनी विवेचन केले.

फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्वागत केले. नेचर वॉक म्हणजे निसर्ग भ्रमंती केल्याने वेगळा आनंद तर मिळतोच, पण त्या सोबत निसर्गात काय बदल होतात, हे पक्ष्यांच्या माध्यमातून आपल्याला समजते. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहा, असा मौलिक सल्ला खरे यांनी दिला. पावशा पक्षी, आयुश सुबक पक्षी, शिंपी (टेलरबर्ड), सातभाई, नाचरा, छोटा निखार, बुलबुल यांसह अनेक पक्ष्यांची त्यांनी माहिती दिली. हनुमंत पाटील यांनी विविध वनस्पतींबाबत माहिती दिली. वेळेच्या बाबतीत व स्थलांतर करताना पक्षी किती अचूक असतात, या बाबत खरे यांनी विवेचन केले. डॉ. सलीम अली यांनी केलेल्या पक्षी अभ्यासाचे, तसेच विविध वनस्पतींवर केलेल्या संशोधनांचेही दाखले दिले.

बारामती परिसरातील गवताळ प्रदेशात जवळपास 268 प्रकारचे पक्षी नोंदवले गेले आहेत. बारामतीच्या नक्षत्र गार्डनमध्ये अतिदुर्मीळ प्रकारचे स्थलांतरित पक्षी आढळतात. देशी झाडांवर पक्षी घरटी करतात, त्यामुळे अशा झाडांना प्राधान्य द्यावे, असेही खरे म्हणाले.
फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निसर्गवाचन करण्याची आवड निर्माण व्हावी, बारामतीकरांना पक्ष्यांबाबत परिपूर्ण माहिती मिळावी, या उद्देशाने निसर्गभ्रमंतीचे आयोजन केल्याचे नमूद केले. या प्रसंगी बारामती पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आवर्जून या निसर्ग भ्रमंतीसाठी उपस्थित होते.

हेही वाचा :

बीड: नेकनूर बाजारातून लाखोचा महसूल: मात्र, पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

प्रगतीचे गुण पाहून कुटुंबीयांनी फोडला हंबरडा; भूगोलाचा पेपर देण्यापूर्वीच झाला होता मृत्यू

भोर : पुनर्वसन प्रस्तावित कोंढरी, धानवली गावांची पाहणी

Back to top button